महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची आज औरंगाबादेत सभा पार पडणार आहे. यापूर्वी गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या सभेत आणि त्यानंतर झालेल्या उत्तर सभेत राज ठाकरे यांनी लाउडस्पीकर संदर्भात ३ मे पर्यंतचं अल्टिमेटम दिलं होतं. दरम्यान, या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्त्वावरून मनसेवर निशाणा साधला होता. आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
"मुख्यमंत्र्यांची अवस्था शोलेतील असरानी यांच्याप्रमाणे झाली आहे. अर्ध्यांनी मनसेवर तुटून पडा, अर्ध्यांनी भाजपवर तुटून पडा आणि आम्ही घरात बसतो," असं म्हणत संदीप देशपांडे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना टोला लगावला. एबीपी माझाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला."राज ठाकरे यांनी केवळ कायदा पाळा असं सांगितलंय. सरकारनंही त्याचं पालन केलं पाहिजे. आम्हाला धमक्या देण्यापेक्षा जे कायदा पाळत नाहीयेत त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक आणि हिंमत सो कॉल्ड हिंदुत्ववादी सरकारनं दाखवली पाहिजे," असं एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले. "आम्ही गुढीपाडव्याच्या सभेपूर्वी ती सभा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारी ठरणार असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या सभेनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं. आजचीही सभा ऐतिहासिक असेल. याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. ते कोणते मुद्दे मांडणार याची उत्सुकता सर्वांना आहे," असंही देशपांडे यांनी सांगितलं.