राज ठाकरेंनी दिलेला अल्टीमेटम आज संपला असून मशीदींवरील भोंग्यांवर आपली भूमिका ठाम असल्याचे राज यांनी आजही स्पष्ट केले आहे. मनसेच्या नेत्यांची पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. यातच आज सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना चकवून गाडीत बसून पोबारा केल्याने मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी या दोघांविरोधात आता ३५३ कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
हा प्रकार राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर घडला होता. यामध्ये धुरी आणि देशपांडे यांना पोलीस त्यांच्याच गाडीत घालत होते. तसेच एक पोलीस अधिकारी त्या गाडीत बसत होता. परंतू, देशपांडे यांनी त्या पोलिसाला ढकलले आणि गाडीचा दरवाजा लावून घेत पलायन केले. या घडामोडीत एका महिला पोलिसाला दुखापत झाली आहे. यामुळे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
मुंबईतील शिवाजी पार्क राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचे सांगितले. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचे पोलिसांना सांगितले. याच वेळी एक खासगी कार पोलिसांच्या वाहनासमोर तयार होती. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी गर्दीतून वाट काढत कार गाठली. दोघंही कारमध्ये बसताच चालकानं कार दामटवली. पोलिसांनी कारच्या मागे धाव घेऊन ती थांबवण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यात त्यांना यश आलं नाही. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पोलिसांना चकवा देऊन निसटले.
यावर आता पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत तसेच सरकारी कर्मचाऱ्याला दुखापत झाल्याबाबत संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. हा गुन्हा अजामिपात्र आहे. यामुळे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अडचणींत वाढ होणार आहे. त्य़ातच हे दोघे कुठे लपलेत याचा शोध पोलीस घेत आहेत.