राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरुन राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात पत्रवाद रंगला असताना आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. डोंबिवलीच्या भोपर परिसरातील १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी आत्तापर्यंत २२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. राज्यात होत असलेल्या महिलांवरील अत्याचारावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
"डोंबिवलीमधील सामूहिक बलात्काराची घटना अंगावर काटा आणणारी आहे. दिल्ली युपीपेक्षा महाराष्ट्राची स्थिती वेगळी नाही हे सिद्ध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अजून काय घडणं अपेक्षित आहे?" असा सवाल करत शालिनी ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.