चिपळूण: मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळं कोकणातील चिपळूण शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. सुदैवानं यात मोठी जीवितहानी झाली नसली तरी प्रचंड आर्थिकहानी झाली आहे. या चिपळूण शहराची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी शहरात आले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामधील एका घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि खास करुन शिवसेनेला चांगलच धारेवर धरलंय.
या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन भास्कर जाधावांना इशारा दिलाय. 'भास्कर जाधव, आज त्या अगतिक महिलेवर जो हात उघारलाय ना…? तोच हात पुढच्या पाच वर्षांनी जोडून जेव्हा मतं मागायला याल, तेव्हा हाच कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,' असं शालिनी ठाकरे म्हणाल्या.
नेमकं काय घडलं ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिपळूण शहराचा दौरा केला. यावेळी त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांना धीर देताना पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची सर्वकष योजना जाहीर केली जाईल असंही सांगितलं. मात्र मुख्यमंत्री व्यापाऱ्यांशी चर्चा करीत असतानाच एका महिलेने ओक्साबोक्शी रडत तिची वेदना मांडली. 'पुराचे पाणी माझ्या घराच्या छतापर्यंत पोहोचलं, त्यात सर्वकाही वाहून गेलंय. तुम्ही काहीही करा, पण आम्हाला मदत करा. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो', अशी विनवणी तिने केली.
तसंच, सर्व आमदार खासदारांचा दोन महिन्यांच्या पगार कोकणला मदत म्हणून द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावेळी भास्कर जाधवांनी 'आमदार खासदारांनी सहा महिन्याचा पगार दिला तरी काय होणार नाय,' असे म्हटलं आणि मुख्यमंत्र्यांसोबत चालणाऱ्या ताफ्याला तिथून पुढे सरकरण्याचा इशारा दिला. मुख्यमंत्री थोडे पुढे गेल्यानंतर जाधव यांनी, 'तुझा मुलगा कुठंय??? तुझ्या आईला समजव. उद्या भेट,' असंही दमदाटी केल्याच्या स्वरात सांगितल्याचं सर्वांनी पाहिलं. याच व्हिडीओवरुन आता विरोधक भास्कर जाधवांवर टीका करताना दिसत आहेत.