शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ देत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेला पुन्हा नव्यानं उभारी देण्यासाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. शिवसैनिकांशी वैयक्तिक पातळीवर जाऊन संपर्क साधत पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे यांनी 'निष्ठा यात्रे'ची घोषणा केली आहे. दरम्यान, यावरून आता मनसेनं शिवसेनेला डिवचलं आहे.
"आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा हा तर एक बहाणा आहे. पक्षात किती लोक उरले आहेत ते कदाचित तपासून पाहत आहेत.....!!! आणि म्हणे मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही. समय समय की बात है," असं म्हणत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टोला लगावला.
आजी-माजी नगरसेवक शिंदेच्या भेटीलाएकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेतून शिंदे गटात जाणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या ६७ माजी नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर नवी मुंबईतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दिला आहे. इतकंच नव्हे, तर नागपुरातील शिवसेना नगरसेवकांनीही शिंदेंना पाठिंबा दिला आहे.