राज्यात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे समर्थक ४० हून अधिक आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणे गरजेचे असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे मी मुख्यमंत्री नको असेन तर मला येऊन सांगा, मी राजीनामा द्यायला तयार आहे अशी भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना घातली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. दरम्यान, मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी यावरून उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
“कोणाचे हिंदुत्व खरे, कोणाचे खोटे हे सिद्ध करता करता शिवसेना आता नक्की कोणाची खरी आणि कोणाची खोटी हे सिद्ध करण्याची तुमच्यावर वेळ आली आहे. सबका हिसाब होता है….!!!,” असं म्हणत शालिनी ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला.