मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते. तर तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल बोलत होते. यावेळी भाषण करताना राज्यपालांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली. आता यावरून चांगलेच राजकारण तापले असून मनसेने देखील राज्यपालांवर सडकून टीका केली आहे.
"ते नेहमी कळी लावायचे काम करतात" राज्यपालांच्या या विधानावर मनसेचे नेते वसंत मोरे आक्रमक झाले आहेत. "राज्यपाल नेहमीच बेताल वक्तव्य करत आहेत, त्यांना त्यांचे वरिष्ठ का सांगत नाहीत. ते नेहमी कळी लावायचे काम करतात. जातीला धरूण बेताल वक्तव्य करणं त्यांनी बंद करायला हवं. त्यांचं वय पण झालं आहे त्यामुळे आता त्यांनी रिटायर व्हायला हवं", अशा शब्दांत मोरे यांनी राज्यपालांच्या विधानाचा समाचार घेतला. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
शिवाजी महारांजावरील वक्तव्यामुळे चिघळला वाद राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले, "आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असं वाटतं तुम्हाला कोणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील". कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये शैक्षणिक कामात प्रगती नसतांना येथे लक्ष घातले आणि मिलिंदच्या माध्यमातून शिक्षण दिले. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे हे विद्यापीठ आहे. याच्या निर्मितीपासूनचा कालखंड मला आठवतो. याच्या जडणघडणीत माझा समावेश होता याचा आनंद आहे. आज विद्यापीठाने डिलीट पदवी प्रदान केली यासाठी अंतकरणापासून आभारी आहे. नितीन गडकरी आणि माझ्या कामाची दखल घेतली गेली यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो. या विद्यापीठाच्या स्थापनेत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा वाटा आहे. या भागात विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय नेतृत्वाने घेऊन संपूर्ण मराठवाड्याच्या शिक्षणाचे दालन खुले झाले. विद्यापीठासाठी संघर्ष झाला. याच भागात आणखी एक विद्यापीठ स्थापन करण्याच्या प्रक्रियेत माझा सहभाग होता याचा आनंद आहे. यामुळे येथे शैक्षणिक दालन खुले झाले, या शब्दांत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"