Maharashtra Politics: कोरोनाच्या संकटानंतर संपूर्ण देशभरात दिवाळीची धूम सुरू आहे. मोठ्या उत्साहात, फटाक्यांच्या आतिषबाजीत दीपोत्सव साजरा केला जात आहे. मात्र, काही मुस्लिम बांधवांनी मुंबई पोलिसांकडे फटाक्यांच्या होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार केली आहे. यावरून मनसेने पुन्हा एकदा भोंग्यांचा मुद्दा काढला आहे. मग विचार करा. आम्हाला तुमच्या भोंग्यांचा किती त्रास होत असेल, असा सवाल उपस्थित केला.
मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी एक ट्विट केले आहे. मनोज चव्हाण यांनी या ट्विटमध्ये मुंबई पोलिसांकडे केलेल्या तक्रारीचा उल्लेख करत काही स्क्रीनशॉट टाकलेले आहेत. याच ट्विटमध्ये, विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल…आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होतो आहे आम्ही रोज फटाके फोडत नाही मात्र तुमची अजान अजुनही भोंग्यावर अनेक ठिकाणी सुरू आहे…थोडं सहन करा कारण दिवाळी आहे, असे मनोज चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
आम्ही भोंग्याचा त्रास सहन करतोय ना, मग तुम्हीही ४ दिवस फटाके सहन करा
मनचिसेचे प्रमुख अमेय खोपकर यांनीही एक ट्विट करत यावर भाष्य केले आहे. ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय, देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही. आमचा सण आहे, आम्ही फटाके वाजवणारच. आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना,मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा, अशा शब्दात खोपकर यांनी दिवाळी फटाक्यांचा विरोध करणाऱ्या काही मुस्लीमांना थेट शब्दात सुनावले आहे.
दरम्यान, दिल्ली सरकारने फटाक्यांवर पूर्ण बंदी घातलेली असली तरी लोकांनी फटक्यांसह धुमधडाक्यात दिवाळी साजरी केल्याचे पाहायला मिळाले. फटाक्यांची प्रचंड आतषबाजी झाली. रस्त्यावर लोक फटाके फोडताना दिसले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"