लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली:कल्याण पश्चिम येथील आधारवाडी डम्पिंग नुकतेच बंद झाले आहेत. मात्र कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी याबाबत एक धक्कादायक आरोप केला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने रिंगरोड आणि इतर प्रकल्पांसाठी डम्पिंग ग्राऊंड बंद केल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे. डम्पिंग बंद केल्याबाबत केडीएमसीचे अभिनंदन करत त्यामागील भावना किती शुद्ध आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पालिकेच्या डोंबिवली येथील विभागीय कार्यालयात आमदार पाटील आणि केडीएमसीचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन कल्याण ग्रामीणमधील लसीकरण, 27 गावांतील कर्मचारी, डम्पिंग आदी विषयांवर चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील विधान केलं. डम्पिंगबाबतचे केडीएमसीचे धोरण म्हणजे एकीकडे खड्डा करणे आणि दुसरीकडे भरणी काहीसे असेच आहे. बारावे येथील प्रकल्पाचाही स्थानिकांना त्रास होत असून पालिकेने कुठे तरी एक सुनियोजित प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले. कोपर पुलाचे पायाभूत काम संथगतीने सुरू असून अद्याप याठिकाणी असणाऱ्या वीज वाहिन्या आणि ट्रान्सफॉर्मर अद्याप शिफ्ट झाल्या नाहीत. कोपर पुलाच्या केवळ तारखा पडत आहेत. यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नसून तो पूल जेव्हा व्हायचा तेव्हाच होईल असा टोलाही त्यांनी यावेळी प्रशासनाला लगावला.