Maharashtra Politics: विविध राजकीय मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी एक ट्विट केले असून, या माध्यमातून शिंदे गटातील एका बड्या लोकप्रतिनिधीवर संताप व्यक्त केला आहे. हा लोकप्रतिनिधी दुसरा, तिसरा कुणी नसून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे असल्याचे सांगितले जात आहे.
कल्याण लोकसभा क्षेत्र आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचा भाग आणि उच्चशिक्षित मतदार असलेल्या पलावा वसाहतीमधील मालमत्ता कर कमी करण्यासाठी मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील जोरदार प्रयत्न करत आहेत. याच विषयी खासदार श्रीकांत शिंदे मात्र या कामाचे श्रेय राजू पाटील यांना मिळू नये, यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनावर दबाव टाकून हे काम तातडीने मार्गी लागणार नाही, अशी खेळी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचमुळे संतप्त झालेल्या पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून खासदार शिंदे यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर टीकेचा प्रहार केला आहे.
नशिबाने तुम्हाला हत्ती दिलेत, चप्पल चोरायच्या गोष्टी करु नका
राजू पाटील यांनी ट्विट केले आहे. यामध्ये शिंदे गटाचा एक मोठा लोकप्रतिनिधी ITP Project म्हणून पलावा सिटीला नियमानुसार जी ६६% सुट मिळावी म्हणून ती मिळविण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करत आहे त्याचे श्रेय मिळू नये म्हणून KDMC आयुक्तांवर दबाव आणत असल्याचे मला काही पालिका अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर निदर्शनास आणून दिले आहे. हे जर खरे असेल तर मला ’त्या’ लोकप्रतिनिधीला एवढेच सांगायचे आहे की नशीबाने तुम्हाला हत्ती दिले आहे व तुम्ही चप्पल चोरायच्या गोष्टी करू नका. लोकहिताच्या निर्णयांना समर्थन द्या, कदाचित हीच पुण्याई भविष्यात तुम्हाला कामाला येईल.आणि हो…..ते श्रेय वगैरे जे काही आहे ना ते तुम्हीच घ्या, आम्हाला त्याची गरज नाही. खोणी पलावासाठी करात ६६% सुट आत्ताचे केडिएमसी आयुक्त व तत्कालीन जि.परिषद CEO दांगडे साहेब यांनी दिली.मग आता तोच नियम व तेच अधिकार असताना कोणाच्या दबावाखाली निर्णय घेतला जात नाही ?, अशी विचारणा ट्विटमध्ये केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"