मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी, हे भोंगे खाली उतरले नाही, तर आम्ही मशिदींसमोर दुप्पट लाऊड स्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवू, असा इशारा राज यांनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. काही पक्षांच्या नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातच, सपाचे आमदार अबू आझमी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका करत, राज ठाकरे यांचे वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारे असून त्यांना अटक करून जेलमध्ये टाकावे, अशी मागणी केली होती. आता यावर, मनसे आमदार राजू पाटूल यांनी आझमींना थेट आव्हन दिले आहे.
अबू आझमी यांच्या या वक्तव्याला उत्तर देत, मनसे आमदार राजू पाटील यांनी, 'टाका, दम असेल तर टाकूनच बघा', अशा शब्दात आझमींना आव्हान दिले आहे. पाटील हे दिव्यात काही उपोषण कर्त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. तेव्हा पत्रकरांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी अशा शब्दांत उत्तर दिली.
काय म्हणाले होते आझमी -राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील मशिदींवरील भोग्यांसंदर्भातील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, "ज्यांच्या पक्षाचा फक्त 1 आमदार आहे. ज्यांना राज्यात जनाधान नाही, अशा नेत्यांचे लोकांनी का ऐकायचे? मशिदीमध्ये अजान केवळ दोन मिनिटांसाठीच होते आणि त्याला परवानगी आहे. यामुळे राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारे असून त्यांना अटक करुन जेलमध्ये टाकावे," असे आझमी यांनी म्हटले होते.