डोंबिवली : दहीहंडी किंवा मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करुन जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्यांनी कोरोना विरुद्ध आंदोलन उभे करावे, असा टोला काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मनसेला नाव न घेता लगावला होता. यावरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही कोरोना संपवण्यासाठी आंदोलनही करत आहोत, पण वसूली सोडून दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ आहे का तुम्हाला? असा सवाल करत एकाला ईडीची नोटीस आली की लावा लॅाकडाऊन, हे आता चालणार नाही, असा इशारा राजू पाटील यांनी म्हटले आहे.
राजू पाटील यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, "काल सेनेचे मुख्यमंत्री बोलले की ‘आंदोलन करायचेच झाले तर ते कोरोना संपविण्यासाठी करा.’ अहो आम्ही ते ही करत आहोत, पण वसूली सोडून दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ आहे का तुम्हाला? एकाला ED ची नोटीस आली की लावा लॅाकडाऊन, हे आता चालणार नाही."
याचबरोबर, राजू पाटील यांनी कोरोना लसीकरणावरून कल्याण-डोबिंवली पालिकेवरही निशाणा साधला आहे. "दुसरी लाट आली तेव्हाच लसीकरणासाठी केंद्र उभारण्यास सुरुवात केली. पालिकेकडे गेलो आयुक्तांना भेटलो, त्यांना सांगितलं आम्हाला चार-पाच लसीकरण केंद्रे उभारायची आहेत, त्याला परवानगी द्या, तुमच्या लसी येतील, त्या लोकांना मोफत टोचून देऊ, पालिकेचाही खर्च होणार नाही. पण त्याच्याकडेही दुर्लक्ष केले. त्यानंतर १६ जानेवारीला जो लसीकरणाचा कार्यक्रम चालू झाला आहे. त्यानंतर पालिकेने अडीच ते पावणे तीन लाख डोस दिले आहेत. रोजची सरासरी काढली तर १५०० आहे. एवढ्या हळूहळू लसीकरण होणार असेल, तर पूर्ण केडीएमसीचे लसीकरण व्हायला दोन वर्षे लागतील", असे राजू पाटील म्हणाले.
दरम्यान, हिंदुत्व विरोधी किंवा हिंदुंच्या सणांच्या विरोधी असणारे सरकार अशी टीका करणाऱ्यांना मी सांगेन की केंद्राकडून देखील तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांनी देखील दहीहंडी किंवा गणेशोत्सवाच्या काळात सर्तकता बाळगा, असे पत्र राज्य शासनाला दिले आहे. त्यामुळे राज्य सरकार हे हिंदुत्व विरोधी किंवा हिंदुच्या सणांच्या विरोधी असणारे सरकार नसल्याचे स्पष्टोक्ती मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच दहीहंडी किंवा मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करुन जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्यांनी कोरोना विरुद्ध आंदोलन उभे करावे, असा टोलाही विरोधकांना लगावला.