पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागासमोर ‘ठिय्या आंदोलन’ केले. विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे एका पर्यावरणशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याला चुकून इलेक्टॉनिक विषयाचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. परीक्षा विभागाच्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याशी याबाबत वारंवार संवाद साधूनही विद्यार्थ्याला प्रमाणपत्र बदलून दिले नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परीक्षा विभागासमोर आंदोलन करून परीक्षा नियंत्रक अशोक चव्हाण यांना घेराव घातला. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभुस, सुधीर भदे यांच्यासह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विद्यापीठाने दोष आरोप निश्चित करावेत. तसेच, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. एकदा झालेली चुक पुन्हा होऊ नये, यासाठी परीक्षा विभागाने आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा कराव्यात, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. लेखी पत्र देत नाही, तोपर्यंत परीक्षा विभागाचे आवार सोडणार नाही, अशी भूमिका घेऊन कार्यकर्त्यांनी ‘ठिय्या आंदोलन’ केले. (प्रतिनिधी)>परीक्षा विभागाच्या प्रमाणपत्र विभागाचे कामकाज एस. आर. भोये यांच्याकडे आहे. आवश्यक सॉफ्टवेअर नसल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. त्यामुळे केवळ कर्मचाऱ्यांनाच दोष देऊन चालणार नाही, तर अधिकाऱ्यांवरही याबाबत जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात केली जात आहे.
परीक्षा विभागाच्या विरोधात मनसेचे आंदोलन
By admin | Published: September 22, 2016 1:52 AM