मुंबई, दि. 2 - मनसेनं बुधवारी मुंबई विद्यापीठाविरोधात जोरदार निदर्शनं केली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी 31 जुलैची डेडलाइन देऊन परीक्षांचे निकाल न लागल्याने मनसे बुधवारी (2 ऑगस्ट) मुंबई विद्यापीठाविरोधात आंदोलन केले. कलिना येथे हे आंदोलन करण्यात आले. ''मुंबई विद्यापीठ प्रशासनावर माझा भरोसा नाय. निकाल दिरंगाईचा निषेध! निकाल दिरंगाईचा निषेध!'',असा आशयाचे बॅनर्स घेऊन मनसेनं मुंबई विद्यापीठ परिसरात निदर्शनं केली. यावेळी कुलगुरू डॉ. संजय देशमुख व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याविरोधातही जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल ५ ऑगस्टपर्यंत लावले जातील, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (1 ऑगस्ट) निकालाची डेडलाइन विधानसभेत जाहीर केली. मात्र, तिकडे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी निकाल १५ ऑगस्टपर्यंत लागतील, असे जाहीर केल्याने निकालाची कोणती डेडलाइन खरी, मुख्यमंत्र्यांची की कुलगुरूंची असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई विद्यापिठांच्या निकालांना उशीर झाला असला तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. परदेशात शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना १५ ऑगस्टपर्यंत गुणपत्रिका देण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. उशिरा निकाल लागल्याने भविष्यातील संलग्न परीक्षांवर परिणाम होऊ, नये यासाठी तावडे यांनी संबंधित फोरमशी चर्चा केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
मुंबई विद्यापीठाच्या निकालांना होत असलेल्या विलंबाचे पडसाद आज सभागृहात उमटले. योग्य वेळेत निकाल लावण्यात मुंबई विद्यापीठ नापास झाले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे देखील अपयशी ठरले आहेत. ऑनलाइन मूल्यांकनाचा प्रयोग फसला असून याचा पुढील परीक्षांवरही विपरित परिणाम होईल, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यावर मुंबई विद्यापीठात ऑनलाइन मूल्यांकनाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने झाली असती तर गोंधळ उडाला नसता, अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली.
विद्यापीठाची आता तिसरी डेडलाइनमुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी सर्व निकाल ५ आॅगस्टपर्यंत जाहीर होतील, असे सांगितले होते. रखडलेल्या निकालांबाबत युवा सेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची भेट घेतली. त्यावेळी लाखो उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी असल्याने विधि आणि वाणिज्य शाखेचे निकाल लागण्यास १५ आॅगस्ट उजाडेल, असे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी त्यांना सांगितले. विधि शाखेच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी औरंगाबाद विद्यापीठातून २५ प्राध्यापकांना बोलवले आहे. तसेच ‘एसएनडीटी’मधूनही प्राध्यापकांना बोलवणार आहेत. ५ आॅगस्टपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले नाहीत तर विद्यापीठाला टाळे ठोकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी दिला.