संजय पाठक ल्ल नाशिककॉँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते, परंतु त्यांना आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी हवे आहेत राज ठाकरे, तर मनसेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना आपले उमेदवार विजयी करण्यासाठी हवा आहे, अशोक चव्हाण ! अजब वाटेल ना... परंतु हे खरे आहे!महापालिकेच्या निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाच्या उमेदवारांची कुठे युती - आघाडी होईल हे सांगता येत नाही, त्यातही पक्षाची परिस्थिती फारशी चांगली नसेल, तर मग सक्षम उमेदवार सांगतील तसे पक्षाच्या नेत्यांना मान्य करावे लागते. नाशिकच्या दोन प्रभागांत कॉँग्रेस आणि मनसेत असाच प्रकार घडला आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये कॉँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आणि प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या शाहू खैरे यांनी आपल्या प्रभागातील उमेदवार ठरवून घेतले. त्यावेळी त्यांच्यासमवेत कॉँग्रेसच्या पक्षाच्या विद्यमान नगरसेवक वत्सला खैरे या त्यांच्याबरोबरच आहेत, परंतु राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी नगरसेवक गजानन शेलार आणि महिला गटातून मनसेच्या उमेदवार तथा नगरसेवक सुरेखा भोसले यांना समवेत घेतले आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळालेले कॉँग्रेस आणि मनसेतील इच्छुक नाराज आहेत. केवळ कॉँग्रेसच नाही, तर मनसेनेही भोसले यांना अशा प्रकारचे पॅनल करण्यासाठी सहमती दर्शविल्याचे सांगण्यात येते. पुरेसे सक्षम उमेदवार मिळत नसल्याची सर्वच पक्षांची ओरड असून, अशा वेळी भौगोलिक क्षेत्राचा विचार करता चार भागांतील चार उमेदवार असले पाहिजे, या गरजेतून हे पॅनल तयार झाले. त्यामुळे मनसे आणि कॉँग्रेसमध्ये विशेषत: ज्या कार्यकर्त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली नाही ते नाराज आहेत. त्यातून हा प्रकार सुरू झाला आहे. प्रचाराला येण्याचे दोघांनाही निमंत्रणमनसेचे मनोज घोडके यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पत्र पाठविले असून, आपल्या पक्षाच्या उमेदवाराने कॉँग्रेसबरोबर आघाडी केल्याने आता त्यांच्या प्रचारासाठी आपण प्रभागात सभा घ्यावी, अशी मागणी केली आहे, तर कॉँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष वसंत ठाकूर यांनी मनसेचे शहर संपर्काध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांची भेट घेतली आणि कॉँग्रेस-मनसे आघाडी झाल्याने कॉँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांचा मध्य नाशिकमधील प्रभाग १३ मध्ये रोड शो घ्यावा, अशी मागणी केली आहे. अभ्यंकर यांनी ठाकूर यांचे राज यांच्याशी बोलणे करून देण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र अद्याप अशी चर्चा होऊ शकली नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
मनसेला हवे अशोक चव्हाण, तर कॉँग्रेसला राज ठाकरे !
By admin | Published: February 15, 2017 12:49 AM