Raj Thackeray Meet Amit Shah In Delhi: सोमवारी रात्रीपासून दिल्लीत असलेल्या राज ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. भाजपा नेते विनोद तावडे यांच्यासह राज ठाकरे आणि अमित ठाकरे अमित शाह यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. यावर मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे.
राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राजकारणात सगळ्या गोष्टी अचानक होत असतात. अशी कुणकुण कुणालाच नसते. राज ठाकरे यांना निमंत्रण आल्यामुळे ते दिल्लीला गेले. काहीतरी विचार करून गेले आहेत. काहीतरी विचार करून समोरच्यांनी बोलावले आहे. जो काही निर्णय होईल, तो योग्य निर्णय होईल. कार्यकर्त्यांच्या भावना, लोकसभेचा लेखाजोखा हा राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता, जे होणार आहे, ते चांगले होणार आहे, असा विश्वास मनसे सरचिटणीस हेमंत संभुस यांनी व्यक्त केला.
अमित ठाकरे युवा नेतृत्व, खासदार झाले तर आनंदच होईल
राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यावर, अमित ठाकरे युवा नेतृत्व आहे. प्रत्यक्षात तसे होणार असेल आणि अमित ठाकरे खासदार झाले तर आनंदच होईल, असे हेमंत संभुस यांनी सांगितले. मनसे पक्ष महायुतीत सहभागी झाला, तरी काही फरक पडणार नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना हेमंत संभुस यांनी टीका केली. ते संजय राऊत आहेत. ते ठाकरे गटात आहेत, तर काही फरक पडत नाहीत. त्यामुळे ते दुसऱ्यांची चिंता का करत आहेत. त्यांना म्हणावे, आधी स्वतःचे पाहा, दुसऱ्यांवर टीका करणे सोडा, या शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात सुमारे ४० मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मनसे सहभागी झाल्यास महायुतीला बळ मिळेल. दक्षिण मुंबईसह मनसेला आणखी कोणते मतदारसंघ दिले जातात, याची उत्सुकता असून, मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नाशिक, पुणे या मतदारसंघांत मनसेची महायुतीला मदत होऊ शकते.