मुंबई- रविवारी गुढीपाडव्याला मनसे नव्या विचारांची राजकीय गुढी उभारणार आहे. २०१४ पासून पिछाडीवर पडलेल्या मनसेने आता वेगाने पुढे यावे यासाठी मनसे समर्थक त्यांचे नेते राज ठाकरे यांच्याकडून वेगळ्या भूमिकेच्या मांडणीची अपेक्षा बाळगून आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पाडवा मेळाव्यात काय बोलणार हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. रस्त्यांवर मनसेच्या पाडवा मेळाव्याचे जाहिरात फलक झळकले असतानाच सोशल मीडियातही #मनसे_पाडवामेळावा या हॅशटॅगने अनेक पोस्ट, ट्विट व्हायरल होतायत.
“महाराष्ट्र धर्माची गुढी उभारण्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळत या...” या आवाहनाच्या ट्विटप्रमाणेच नेमका काय अजेंडा असावा ते स्पष्ट करणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. “प्रश्न कुठलाही असो उत्तर मनसे हे एकच...” असा पुन्हा एकदा विश्वास जागवण्याचा आणि कमवण्याचा प्रयत्न करणारी पोस्ट फिरत आहे. तसेच काही पोस्टमध्ये “शेतकऱ्यांच्या पोळलेल्या पायांवर फुंकर घालण्यासाठी फक्त मनसेच”
शेतकरी मोर्च्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या मुद्द्याला हात घालतानाच पारंपरिक मुद्द्यांनाही सोडलेलं नाही. “अखंड महाराष्ट्रासाठी फक्त मनसे....मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन...मुंबई बडोदा एक्स्पेस वे...महाराष्ट्रासाठी की गुजरातसाठी?” असं विचारण्यात आले आहे. थेट भाजपच्या गुजरातप्रेमावरही प्रहार करणाऱ्या पोस्टही आहेत. “मोदींना गुजरात प्यारं मग राज ठाकरे संकुचित कसे?” असा खडा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. एकीकडे मनसे हाच सर्व प्रश्नांवर एकच इलाज असल्याचे सांगतानाच दुसरीकडे नंबर एकचा शत्रू असणाऱ्या शिवसेनेलाही डिवचलं गेले आहे. एका व्यंगचित्रातून शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधण्यात आला आहे.
शिवसेना नाही नंबर एक शत्रूमनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मात्र शिवसेना नंबर एकचा शत्रू असल्याचा इंकार केला आहे. शिवसेनेच्या विरोधापेक्षा आम्ही आमच्या पक्षाला नंबर बनवून सत्ता ताब्यात घेण्यावर भर देऊ. महाराष्ट्राचं भलं करु. शिवसेनेने सरकारमध्ये राहायचे आणि विरोधही करायचा या भूमिकेतून लोकांच्या मनातील स्थान गमावले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना सर्वांनाच संधी दिलेली जनता आम्हाला संधी द्यावी. आम्ही महाराष्ट्र घडवू, असेही ते म्हणले. लोकमतच्या फेसबुक लाइव्हमध्ये त्यांनी हे मत मांडलं.
अर्थात तसं पाहायला गेले तर वातावरण निर्मितीत मनसे नेहमीच आघाडीवर असते. त्यामुळे मनसेच्या पाडवा मेळाव्याची तयारीही जोशात झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात शिवतीर्थावर पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात, कशा पद्धतीनं मराठी मनाला साद घालतात आणि त्याचप्रमाणे पुढे प्रत्यक्षात ते आणि त्यांचा मनसे पक्ष हे कृती कशी करतात....त्यावरच राज ठाकरे म्हणतात तसं महाराष्ट्रापेक्षाही मनसेचं भवितव्य ठरणार आहे.