मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सदस्य नोंदणी अभियान सुरु करण्याची घोषणा केली होती. तसेच ते पुण्याला जाणार होते, यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना कोणताही कार्यक्रम, बैठका ठेवू नका असे सांगितले होते. परंतू, आता राज यांच्या पुणे दौऱ्यामागचे खरे कारण समोर आले आहे.
मनसे उद्यापासून राज्यभरात सदस्य नोंदणी अभियान राबविणार आहे. राज ठाकरे पुण्यातून पहिला अर्ज भरून या अभियानाची सुरुवात करणार आहेत. सकाळी ९ वाजता पुण्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मंगळवारी राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मोठी जबाबदारी सोपवत असल्याचे म्हटले होते. निवडणूक आयोगानुसार दर तीन- चार वर्षांनी पक्षाला सदस्य नोंदणी करावी लागते. यंदा मोठ्या प्रमाणावर सदस्यनोंदणी होणार आहे. त्यामुळे आपणही लोकापर्यंत जास्त वेगाने पोहोचायला हवे, मनसे देखील लवकरच सदस्य नोंदणी अभियान सुरु करेल असे राज ठाकरे म्हणाले होते. यानंतर लगेचच आज मनसेच्या सदस्यनोंदणीची घोषणा करण्यात आली आहे.
सणांमध्ये आणखी एक मोहिम... गणेशोत्सव, दसरा, नवरात्र, दिवाळीत अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी एक मोहिम उघडली जाणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी, चौकात मनसेचे बॅनर, पोस्टर लागले पाहिजेत. ते कसे असावेत, काय काय असावे हे तुम्हाला कळविले जाईल. परंतू, मला ते सर्वत्र दिसायला हवेत असेही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. पक्षातील उणीदुणी चव्हाट्यावर न येण्यासाठी राज ठाकरेंनी आपल्यातील वाद सोशल मीडियावर पोस्ट करून नयेत असा दम भरला आहे. राज्यात दिवाळीनंतर कधीही निवडणुका लागू शकतात. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी कधीही निवडणूक लागेल, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.