कल्याण-डोंबिवलीएमआयडीसीतील शिवाई बालकमंदीर शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे आंदोलन मनसेच्या वतीने आज करण्यात आले. श्रमदानातून स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले.
मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, प्रकाश माने, सरोज भोईर, दिपिका पेडणोकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. एमआयडीसी रस्त्याची चाळण झाली आहे. पावसामुळे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी त्यात साचून रस्ता चिखलमय झाला आहे. या चिखलमय खड्डय़ाच्या रस्त्यातून वाहन चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागते. तसेच वाहने सावकाश चालवून देखील अपघात होण्याची शक्यता आहे. दुचाकी चालकांचा अपघात होऊ शकतो. हे रस्ते एमआयडीसी हद्दीतील असून कारखानदार कोटय़ावधी रुपयांचा कर महापालिकेस भरतात. एमआयडीसी आणि महापालिका एमआयडीसी परिसरातील नागरीकांना सोयी सुविधा पुरवित नाही. सरकारने रस्ते विकासासाठी निधी मंजूर केला असला तरी रस्ते विकासाला कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नागरीकांना खड्डयातून प्रवास करावा लागत आहे.