MNS Prakash Mahajan News: राज ठाकरे यांनी महायुतीला जाहीर केलेला निर्णय खूप विचार करून घेतला आहे. राज ठाकरे यांनी भूमिका खूप विचार करून घेतली आहे, काही कार्यकर्त्यांना ती भूमिका समजून घ्यायला काही वेळ लागेल. ज्याप्रकारे राज ठाकरेंनी भूमिका घेतली त्यामुळे विरोधकांचा अपेक्षाभंग झाला आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते प्रकाश महाजन यांनी दिली आहे.
राज ठाकरेंनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता आमची ताकद वाढल्याचा विश्वास महायुतीमधील अनेक नेत्यांनी व्यक्त केला आहे. तर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून राज ठाकरेंवर टीका केली जात आहे. मीडियाशी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, विरोधकांचा अपेक्षाभंग झाल्यामुळे त्यांची कोल्हेकुई सुरू झाली आहे. ट्रोलिंग विरोधकच करतात. राज ठाकरेंचं महत्त्व काय सर्वांना माहिती आहे, म्हणून ट्रोलिंग केले जात आहे, असे प्रकाश महाजन म्हणाले.
हिंदुत्वाच्या प्रश्नावर नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे
मनसेचे कार्यकर्ते संभ्रमात नाही. राज ठाकरेंनी घेतली भूमिका हिंदुत्वाच्या प्रश्नावर आहे. हिंदुत्वाच्या प्रश्नावर नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. भूमिका बदलणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. राज ठाकरेंचा आवाका विरोधकांना कळलेला नाही. आधुनिक काळात राजकारणातले कर्ण राज ठाकरे आहेत. हिंदुत्वाच्या नावावर जर कोणी राज ठाकरेंना मदत मागायला आले, तर राज ठाकरे यांनी ती मदत खुलेपणाने दिली, असे प्रकाश महाजन यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, सध्याची भूमिका देश हित लक्षात ठेवून राज ठाकरे यांनी घेतली आहे. विधानसभेला प्रश्न वेगळे असेल चित्र वेगळे असेल. त्यावेळीची भूमिका काहीशी वेगळी असू शकते. वाटाघाटी करणे हा राज ठाकरे म्हणाले त्यांचा स्वभाव नाही. आता विधानसभेला नेमकी काय भूमिका घ्यायची हे राज ठाकरे आणि काही नेते सांगतील. विधानसभेला आम्ही ताकदीने उतरणार आहोत, असे प्रकाश महाजन म्हणाले.