Bharat Ratna: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरसिंह राव, चौधरी चरणसिंह आणि एमएस स्वामिनाथन यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने 'भारतरत्न' (Bharatratna) पुरस्कार देण्याचा नवा विक्रम केला आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारकडे एक मोठी मागणी केली.
लक्षणीय बाब म्हणजे इतरांना दाखवेलं औदार्य हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंप्रती देखील दाखवून त्यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत ही मागणी केली.
ते म्हणाले की, माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो.
तसेच बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल, असेही राज यांनी नमूद केले.
मागील १५ दिवसांत पाच मोठ्या व्यक्तींना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान मिळवणाऱ्यांमध्ये २ माजी पंतप्रधान, १ माजी उपपंतप्रधान, १ माजी मुख्यमंत्री तसेच प्रसिद्ध कृषी तज्ज्ञांचा समावेश आहे. यातील चौघांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येत आहे. या पाच नावांची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.