मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी आहेत. पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागण्याचे संकेत सत्ताधारी नेत्यांकडून दिले जात आहेत. त्यातच १२ तारखेला होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे अनेकांचे लक्ष आहे. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत तर आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. मात्र या दोन्ही मेळाव्याच्या आधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे चर्चेत आले आहेत.
आज प्रमुख वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर राज ठाकरेंच्या यांची जाहिरात झळकली आहे. त्यात माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..चला पूर्वीसारखा राजकीय सुसंस्कृत आणि सर्व राज्यांपेक्षा प्रगत महाराष्ट्र उभारूया..मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा असा उल्लेख करत राज ठाकरेंचा फोटो छापण्यात आला आहे. मागील काही काळात राज ठाकरे सातत्याने राज्यातील बिघडलेल्या राजकारणावर टीका करत आहेत. राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस केली असा आरोप राज यांनी केला आहे. त्यातूनच आजची ही जाहिरात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी आहे.
मनसेनं राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याचं जाहीर केले आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असताना काही उमेदवारांची घोषणाही राज यांनी केली आहे. आता शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरेंची ही जाहिरात नेमकं काय संकेत देतात याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. २०१९ च्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका, मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपा यांच्यातील संघर्ष आणि त्यानंतर शिवसेना फूट या सर्व गोष्टींमध्ये प्रामुख्याने हिंदुत्वाच्या भूमिकेपासून उद्धव ठाकरे दुरावलेत असं चित्र विरोधकांनी राज्यात निर्माण केले आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या भाषणात हिंदू ऐवजी देशभक्त असा उल्लेख करण्यात आला होता. यातूनच हिंदुत्व आणि मराठी मते उद्धव ठाकरेंकडून दुरावली असा आरोप होतो. त्यामुळे राज ठाकरेंनी गेल्या ५ वर्षापासून आक्रमक हिंदुत्व, मराठी भाषा यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे.
या जाहिराती मनसेच्या त्याच निवडणूक रणनीतीचा भाग आहेत का अशी चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेत राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. परंतु मागील काळात भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढली आहे.
दसऱ्याला राज ठाकरे जनतेशी संवाद साधणार?
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे युट्यूब पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. येत्या १३ ऑक्टोबरला मुंबईत मनसेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा आहे. त्यामुळे या मेळाव्यातही राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.