पुणे - मतांसाठी मनं कलुषित करणं हे महाराष्ट्रासाठी चांगलं लक्षण नाही. लहान मुलींचे व्हिडिओ पाहिले हे अत्यंत दुर्दैवी, राजकारण्यांनी याचा विचार केला पाहिजे. आपसात जे काही मतभेद असतील, मतदान करून घ्यायचं असेल ते करा पण जातीपातीत विष कालवून तुम्हाला मतदान करून घ्यायचं असेल तर महाराष्ट्राचं भविष्य चांगलं नाही अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. राज्यात सुरू असणाऱ्या आरक्षण वादावरून राज यांनी हे भाष्य केले.
गेल्या २ दिवसांपासून राज ठाकरे पुण्यात पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यानंतर आज त्यांनी पुण्यातील माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, शरद पवारांनी केलेले विधान मी ऐकलं नाही. शरद पवारांनी हातभार लावू नये. राज्यात जोपर्यंत कायद्याची भीती नाही तोपर्यंत अशा गोष्टी घडत राहणार. आपण सहजपणे सुटू शकतो असं काहींना वाटायला लागते, तेव्हा भीती नावाची गोष्ट उरलेली नसते. महाराष्ट्रात जे काही चालू आहे ते दुर्दैवी आहे. फक्त मतांसाठी मनं कलुषित करण्याचं जे काही सुरू आहे ते चांगले नाही असं सांगत शरद पवारांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती घडू शकते या विधानावर राज यांनी प्रतिक्रिया दिली.
तसेच एक उपमुख्यमंत्री पुण्याचे आहेत ते नसतानाही धरणं वाहतंय. मुळा मुठा नदीत अनधिकृत बांधकामे झालीत. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचे आहे. लोकांची अनेक वाहने पाण्याखाली होती. लोकांना पूर्वसूचना न देता पाणी सोडलं असेल तर राज्य सरकारने त्यांना मदत करणे गरजेचे आहे. गेली अनेक वर्षे मी पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही असं सांगतोय, टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही. शहर नियोजनात शाळा, बागा या गोष्टी येतात. पण राज्यात कुठेही हा प्रकार दिसत नाही. दिसली जमीन की विक हा प्रकार राज्यात सुरु आहे असा आरोपही राज ठाकरेंनी केला.
दरम्यान, महापालिका अधिकारी, बिल्डर, प्रशासन या साखळीतून या गोष्टी होतायेत. पुण्यात एक शहर राहिले नाही तर ५-५ शहरं झालीत. पुण्यात खूप कमी काळात या गोष्टी घडल्यात. शहर कुठपर्यंत पसरतंय हे कळत नाही. गेली २-३ वर्ष केंद्र सरकार राज्यातील महापालिकांच्या निवडणुका घेत नाही. नगरसेवक नाही मग जबाबदारी घेणार कुणी, प्रशासनाशी बोलायचं कुणी यामुळे या पुराची जबाबदारी प्रशासनाची आहे. बाहेरून येणाऱ्यांना फुकट घरे मिळतात या राज्यातील लोकांना भीका मागावी लागते. राज्य म्हणून कुणाचं लक्ष आहे की नाही. प्रत्येकजण आपापल्या राज्याचा विचार करतोय महाराष्ट्राचा कुणी विचार करणार की नाही. झोपडपट्टी पूर्नवर्सनात अनेक बाहेरचे लोक मोठ्या प्रमाणात घरे घेतायेत असं सांगत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.