ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून जोरदार पक्षीय राजकारण सुरू आहे. शिवसेना-भाजपामध्ये श्रेयाची लढाई सुरू झालेली असतानाच मनसेनेही या वादात उडी मारली आहे. भाजपाने शिवसेना भवन परिसरातील भिंतीवर ' शिव स्मारकाचे मोदींच्या हस्ते जलपूजन' अशी जाहिरातबाजी केली. मात्र मनसे कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेत मोदींच्या बॅनरवर स्प्रे मारला.
शिवसेना भवनासमोरच्या कोहिनूर टॉवरच्या भिंतीवर आधी मनसेची जाहिरात होती. मात्र ही जाहिरात पुसून भाजपने शिवस्मारकाच्या भूमिपूजनाबाबत मोदींची जाहिरात लावली. यामुळे आक्रमक झालेल्या मनसेने भाजपची जाहिरात पुसली.
दरम्यान भाजपा शिवसेनेमध्येही पोस्टर युद्ध सुरू झाले असून हे स्मारक म्हणजे भाजपाची वचनपूर्ती असल्याचा दावा केला जात असतानाच 'शिवस्मारक व्हावे ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची इच्छा ' असल्याचे प्रत्युत्तर शिवसेनेने दिले. त्यावर प्रत्युत्तर देताना भाजपाने शिवसेना भवन परिसरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते जलपूजन असे बोर्ड लावले.