मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या रिक्षा परवान्यांविरुद्ध पुकारलेले आंदोलन तात्पुरते का होईना मागे घेतले आहे. रिक्षा आता जाळू नका. नवीन रिक्षा आल्यावर काय ते बघू, असे सांगत रिक्षांविरोधातील आंदोलन तूर्त स्थगित करण्याची सूचना राज यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांना केली. ९ मार्च रोजी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित सोहळ्यात राज ठाकरे यांनी नव्या रिक्षांविरोधात कार्यकर्त्यांना चिथावणीवजा आदेश दिला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री अंधेरीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर रिक्षा जाळण्यात आल्याची घटना घडली; शिवाय शुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढत नव्या रिक्षा परवान्यांना विरोध केला. हे प्रकरण आणखी चिघळू नये, म्हणून राज यांनी हे आंदोलन थांबविण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे जोवर आंदोलनाबाबतची पुढील कोणतीही सूचना मिळत नाही तोवर आंदोलनासंदर्भात कोणतेच पाऊल उचलण्यात येऊ नये, अशी तंबीच राज यांनी दिली. मात्र नंतर हे घूमजाव नव्हे, अशी सारवासारवही केली.दरम्यान राज ठाकरे यांच्या नवीन रिक्षा जाळण्याच्या चिथावणीखोर विधानावर विधिमंडळात नाराजी व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी)
मनसेचे रिक्षांविरुद्धचे आंदोलन स्थगित
By admin | Published: March 12, 2016 4:36 AM