मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्यात आहेत. आज पुण्यात जाहीर सभा झाल्यानंतर संध्याकाळी त्यांनी मुंबई एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. राज ठाकरे यांचे व्याही असलेल्या लेखक डॉ. संजय बोरुडे यांनी लठ्ठपणावर लिहिलेल्या Generations XL या पुस्तकाचं आज प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि अभिनेते जॅकी श्रॉफ देखील उपस्थित होते. राज ठाकरे यांनी वजनवाढ आणि खाण्याची पथ्य यावरुन केलेल्या विधानांनी कार्यक्रमाला रंगत आली. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपलं वजन सारखंच होतं अशी आठवण राज ठाकरेंनी यावेळी सांगितली.
"माझं आणि बाळासाहेबांचं वजन सारखंच होतं. माझं जवळपास ३५ वर्ष ६३ किलो इतकंच वजन होतं. पण सध्या शारिरीक वजन कमी करून मला आता सामाजिक वजन वाढवणं खूप गरजेचं आहे. वजन वाढवण्याचं कारण म्हणजे कदाचित मी शिव्यापण खूप खातो त्यामुळे कदाचित वजन वाढलं असेल", असं राज ठाकरे म्हणाले आणि कार्यक्रमात एकच हशा पिकला.
डॉ. बोरुडे यांच्या पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका आशा भोसले देखील उपस्थित होत्या. त्यांच्याबद्दलचाही एक किस्सा राज ठाकरेंनी यावेळी सांगितला. "आशाताई उत्तम सुगरण आहेत. मी त्यांच्या घरी जेवायला गेलो तेव्हा अख्खं डायनिंग टेबल भरलं होतं. मला वाटलं माझ्यासोबत आणखी कुणी येणार असेल. पण ते फक्त माझ्यासाठी होतं. ते जर माझ्यासाठी असेल तर एवढंसं कसं खायचं मला जरा सांगा", असं राज ठाकरे म्हणताच हशा पिकला आणि सर्वांनी राज ठाकरेंच्या हजरजबाबीपणाची दाद दिली.
व्यायाम महत्त्वाचा कारण..."माझा हाथ फ्रॅक्चर झाला आणि आता माझ्या पायाचं ऑपरेशन देखील आहे. माझ्या शारिरीक त्रासामुळे मला गेली दीड वर्ष व्यायाम करता आला नाही. त्यामुळे वजन वाढलं आहे. सगळ्या गोष्टी कंट्रोल केल्या पाहिजेत नाहीतर मी पण नव्वदीत जाईन. कारण आता माझं वजन ८२ किली आहे तेही लवकरच ९० होईल. मग मीही नव्वदीत जाईन", असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर आशाताईंनी वयाच्या नव्वदीत का? असं राज यांना विचारलं असता राज यांनी "नाही वजनच्या म्हणतोय मी", असं म्हटलं सभागृहात हास्यकल्लोळ पाहायला मिळाला.