कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने १३६ जागा जिंकून भाजपचा दारूण पराभव केला तर भाजपला अवघ्या ६५ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकांत बजरंग दलावरील बंदीबाबतचा प्रचारात गाजलेला मुद्दा भाजपला तारू शकला नाही. ‘बजरंगबली’ काँग्रेसवर प्रसन्न होते व विजयामुळे हा पक्ष बाहुबली ठरला, असे चित्र या निवडणूक निकालांतून दिसून आले. या राज्यात काँग्रेसने तब्बल १० वर्षांनी स्वबळावर सत्ता मिळविली आहे. याच दरम्यान कर्नाटक निकालावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"आपलं कोण वाकडं करू शकतो अशा विचाराचा जो असतो त्याचा हा पराभव आहे. जनतेला, लोकांना कधीही गृहित धरू नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा" असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. अंबरनाथमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. "मी मागे माझ्या भाषणात म्हटलं होतं की, विरोधी पक्ष हा जिंकत नसतो, तर सत्ताधारी हरत असतात. मला वाटतं हा पराभव स्वभावाचा पराभव आहे, वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकडं करू शकतो अशा विचाराचा जो असतो त्याचा हा पराभव आहे, असं मला वाटतं. जनतेला, लोकांना कधीही गृहित धरू नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा" असं देखील राज यांनी म्हटलं आहे.
कर्नाटक निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का? असा प्रश्न विचारला असता "कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून महाराष्ट्रातील निकालाबाबत लगेच सांगता येणार नाही" असं म्हटलं आहे. तसेच भारत जोडो यात्रेचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतो. तुमच्या मालकांनी बातम्या दाबल्या तरीही भारत जोडो यात्रेचा प्रभाव दिसतोय. तुम्ही कितीही नाकारलं तरीही या निकालात भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला आहे. मात्र पुढे हा प्रभाव राहील की नाही माहीत नाही. ते सांगायला मी काही ज्योतिषी आहे काय?" असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
कर्नाटक निकालानंतर राजधानी दिल्लीत मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री कोण होणार सिद्धरामय्या की डी. के. शिवकुमार? यावर आता चर्चा होऊ लागली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आमदारांमध्ये लोकप्रिय आहेत तसेच राहुल गांधी यांच्या पसंतीचे मानले जातात. दुसरे वरिष्ठ नेते डी. के. शिवकुमार मल्लिकार्जुन खरगे यांच्या खास मर्जीतील आहेत. त्यात प्रियांका गांधी यांचेही आशीर्वाद शिवकुमार यांच्या पाठीशी आहेत.
काँग्रेस महासचिव व कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांचाही या विजयात मोठा वाटा आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी निवड करताना सुरजेवाला यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पक्षात अशीही चर्चा आहे की, मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित करताना राजधानीतील पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विशेषत: राहुल गांधी यांच्याच निर्णयावर रणदीप सुरजेवाला यांच्याकडून शिक्कामोर्तब केले जाईल. तसेच मुख्यमंत्रिपदासाठी निवड करताना पक्षाचे अध्यक्ष या नात्याने खरगे यांचीही भूमिका महत्त्वाची असणार आहे.