औरंगाबाद पोलिसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल केल्यानंतर राज ठाकरे आपली भूमिका जाहीर करतील असे सांगितले जात होते. अखेर राज ठाकरेंचे पत्र आले असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना बाळासाहेब ठाकरेंचे ऐकणार की शरद पवारांचे असा सवाल विचारत कोंडीत टाकले आहे. याचबरोबर तीन गोष्टी करण्याचे आदेश, आवाहन त्यांनी केले आहे.
मशिदींवरचे भोंगे ४ मेपर्यंत उतरवा, असे आम्ही सरकारला आधीच सांगितलं होतं. परंतु याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची आहे. या देशातल्या राज्य सरकारांतला प्रत्येकजण सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देतोय. या भोंग्यांचा जनतेला त्रास होत आहे. भोंग्यांच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे, त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की “रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुणालाही ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्याच दिवसांपुरती ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी मिळेल, परंतु ३६५ दिवस परवानगी मिळणार नाही. ध्वनिक्षेपकासाठीची परवानगी ही रोज घ्यावी लागेल.", असे राज ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे.
याचबरोबर हिंदू जनतेला तीन आदेशवजा आवाहन केले आहे. हिंदूंच्या सणांना सायलन्स झोन, शाळा, रुग्णालय अशा सर्व प्रकारच्या अटीशर्तीच्या नावाखाली मर्यादा घालायच्या, परंतु मशिदींना कोणत्याही प्रकारच्या अटी घालायच्या नाहीत! भारतीय संविधानाने सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या व्याख्येत हे बसते? असा सवाल राज यांनी विचारला आहे.
यानंतर हिंदूंनी काय करावे, यावर त्यांनी सूचना केल्या आहेत. १. त्यांना आपली हनुमान चालीसा ऐकवा.२. सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात नेऊन द्यावीत.३. मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या झाल्या पोलिसांसाठीच्या १०० या क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांचा त्रासाबाबत तक्रार करावी. रोज करावी.असे राज ठाकरेंनी करण्यास सांगितले आहे.
सामाजिक भान बाळगत ज्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्या मशिदींशी संबंधित लोकांच्या स्तुत्य निर्णयाचे मी स्वागत करतो. तसंच, जिथे भोंगे उतरवण्यात आले आहेत, त्या मशिदींच्या परिसरात कोणताही त्रास होणार नाही, याची हिंदू बांधवांनीही काळजी घ्यावी, असे आवाहनही राज ठाकरेंनी केले आहे.