Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेला महाराष्ट्रातूनही मोठा पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राहुल गांधी यांनी कर्नाटकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. यावरून आता राहुल गांधींवर निशाणा साधला जात आहे. या प्रकरणी शिंदे गट आणि भाजपसह मनसेही आक्रमक झाली असून, पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना महत्त्वाचे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांना मदत करत होता. हे एतिहासिक तथ्य आहे की, स्वातंत्र्याच्या लढाईत हे कुठेही दिसले नाहीत. हे सत्य भाजपच्या नेत्यांनी मान्य करावे, सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचे आमंत्रण दिले. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असे राहुल गांधी कर्नाटकातील तुमकूर येथे बोलताना म्हटले होते. यावरून आता भाजप, शिंदे गट आक्रमक झाले असून, आता मनसेनेही यात उडी घेतल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आदेश दिले आहेत.
शेगावला जा आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवा
काँग्रेसची भारत जोडो यात्रा बुलढाण्यात असणार आहे. या ठिकाणी राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांना जमा होण्याचे तसेच शेगावला जा आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवा, असे आदेश राज ठाकरेंनी दिल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. सावरकरांचे देशासाठीचे योगदान अमुल्य आहे. त्यांचा हिंदुत्वाचा विचार काल, आज आणि उद्याही आम्हाला आदरणीय आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात कायम आदरच आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींच्या विधानाचा निषेध केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा विचार जमिनीत गाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"