मुंबई - पाणी, आरोग्य, नोकरी यासारख्या प्रश्नांवर वेळ द्यायला कुणी तयार नाही. आपल्याकडे लाडकी बहीण, लाडका भाऊ हे सुरू आहे. लाडकी बहिण, लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते त्यासाठी योजना कशाला हवी? असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे.
वांद्रे येथे मनसेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर भाष्य करत पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. राज ठाकरे म्हणाले की, बहिणीला दीड हजार रुपये देणार, यासाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत का?, रस्त्यावरचे खड्डे बुजवायला सरकारकडे पैसे नाहीत. महाराष्ट्रातील मूळ प्रश्नाकडे लक्ष देणं गरजेचे आहे. हेच येणाऱ्या विधानसभेत तुमचा प्रचार आणि पक्षाचं कॅम्पेन असलं पाहिजे असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
तसेच माझ्याकडे महाराष्ट्राच्या मतदारसंघाची यादी होती, प्रत्येक मतदारसंघात तिथला आमदार कुठल्या पक्षात आहे, कोण कुठे गेलाय, कुठे आहे हे काही कळत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या सर्व राजकीय पक्षांत जो काही घमाशान होणार आहे तो न भूतो असा असेल. आपल्या पक्षातील १-२ पदाधिकारी कुठल्यातरी एका पक्षात जायच्या तयारीत आहेत. मी स्वत: येऊन लाल कार्पेट घालतो, जा म्हणून...जो काही भविष्याचा सत्यानाश करून घ्याल तो घ्या, या लोकांचेच काही स्थिर नाही, तुम्हाला कुठे डोक्यावर घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत काय झालं ते पाहिले, वर्षा बंगल्यापर्यंत घुसले. आता विधानसभेला कुठे कुठे घुसतील माहिती नाही असं सांगत राज ठाकरेंनी पक्षातून जाणाऱ्यांनाही सूचक सल्ला दिला.
मनसे २२५-२५० जागा लढवणार
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मला मनसेची लोक काहीही करून सत्तेत बसवायची आहेत. अनेकजण हसतील पण ही गोष्ट घडणार म्हणजे घडणार. सगळे आम्ही तयारीला लागलेत. युतीचा विचार मनात आणू नका, २२५ ते २५० जागा मनसे लढवणार आहोत. सगळ्या गोष्टी तपासल्या जाणार, पक्षांतर्गत टीम जिल्ह्यात येतील, तुमच्याशी बोलतील. माझ्याकडे जो काही सर्व्हे येईल. त्यानंतर जवळपास १ ऑगस्टपासून मी महाराष्ट्राचा दौरा करतोय. जिल्हाजिल्ह्यात भेटीगाठी होतील. पावसामुळे मेळावे घ्यावे की नाही हे ठरवू. पदाधिकाऱ्यांशी, महाराष्ट्र सैनिकांशी संवाद होईलच असं राज ठाकरेंनी सांगितले.