Raj Thackeray, Invitation of Narendra Modi oath taking: सुमारे दोन ते अडीच महिन्यांच्या रणधुमाळीनंतर अखेर ४ जूनला लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. यात भाजपाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. भाजपाला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नसला तरी भाजपप्रणित NDA ने मात्र बहुमत मिळवले. त्यामुळे आता NDA सरकार स्थापन झाले असून त्यातील सुमारे ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथविधीला सुमारे ८,००० निमंत्रित हजर होते. भाजपाचे सर्व राज्यातील मित्रपक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण होते. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मात्र निमंत्रण मिळालं नसल्याची चर्चा आहे. या मुद्द्यावर मनसे नेते बाळा नांदगावकरांनी ( Bala Nandgaokar ) प्रतिक्रिया दिली.
"राज ठाकरे यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण आले होते की नाही, याबद्दल मला नीट माहिती नाही. याबाबत राज ठाकरेच योग्य पद्धतीने सांगू शकतील. सुधीर मुनगंटीवार यांचा मला फोन आला होता. मी त्यांना सांगितले. पण राज ठाकरे यांना जर त्यांचा परस्पर फोन आला असेल तर त्याबाबत मला कल्पना नाही," असे अतिशय सावध उत्तर बाळा नांदगावकर यांनी दिले.
पुढे ते म्हणाले, "आज शिवसेना शिंदे गटाचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. दीपक सावंत, ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव नलावडे यांनी शिवतीर्थ वर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी दोनही उमेदवारांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती करायला हे लोक आले होते आणि आता ते त्यांच्या प्रचारकामाला निघून गेले आहेत. आमची महायुतीत सोबत असल्याने त्यांना सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे."
निमंत्रणाच्या गोंधळावर भाजपाचे सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
"या संदर्भात बाळा नांदगावकर यांच्याशी चर्चा झाली आहे. ते म्हणाले की आम्हाला निमंत्रण आलेलं नाही. हे निश्चितपणे मी वरिष्ठांच्या कानावर घालेन. घाई गर्दीमध्ये विसरले असतील, कारण यात दुसरे काही कारण वाटत नाही. कधी कधी घाईमध्ये निमंत्रण देताना जी यादी करतात, तिथे आपले मित्र आहेत त्यांना निमंत्रण द्यायचे राहून जाते. केंद्रीय पक्षाने याची नोंद घ्यायला हवी. आपल्याला जेव्हा एखादा मित्र मैत्रीचा हात पुढ करतो तेव्हा असं होऊ नये याची काळजी घ्यायला हवी," असे सूचक विधान मुनगंटीवारांनी केले.