कोल्हापूर - मुख्यमंत्रिपदापर्यंत असेपर्यंत आरोग्याचं कारण सांगून पुढे येत नव्हते. जेव्हा पद गेले तेव्हा सगळं व्यवस्थित झाले. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे लोकांना भेटत नव्हते. अनेकांना वर्षावर ताटकळत ठेवले जायचे. त्यामुळे प्रकृतीवर नव्हे तर परिस्थितीवर टीका केली असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोल्हापूरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, मी जी टीका केली ती आरोग्यावर नव्हे तर परिस्थितीवर होती. हा विषय आरोग्याचा किंवा प्रकृतीचा नाही. आता काही समस्या नाही. कुणाच्याही आरोग्याबाबत सुधारणाच व्हावी. लोकांना भेटायचं टाळत होता पण मुख्यमंत्री पदावरून उतरल्यावर भेटी सुरू झाल्या, दौरे काढले. मग तेव्हा का नाही भेटले? कित्येक लोकांना वर्षावर ताटकळत ठेवायचे. ही प्रकृतीची नव्हे परिस्थितीशी चेष्टा होती असं त्यांनी म्हटलं.
पक्षाला सत्तेत येण्यासाठी काळ जातोराष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाली तेव्हा काँग्रेसमधील १ गट उठला आणि पक्ष स्थापन केला. माझ्या पक्षाला १६-१७ वर्ष झाली. २०१४ ला भाजपाच्या हाती सत्ता आली. परंतु १९५२ मध्ये भाजपाची स्थापना झाली. प्रत्येक गोष्टीला काही काळ लागतो. शिवसेना १९६६ साली जन्माला आली. मुंबई महापालिका यायला २५ वर्ष लागली असंही राज ठाकरे म्हणाले.
मी माझं काम करतो, दुसऱ्याचं नाहीकुठलाही लढा हा प्रस्थापितांच्या विरोधात असतो. प्रत्येक पक्षाचं, संघटनेचं अंतर्गत काम सुरू असते. ते जाहीरच करावं असं काही नाही. अनेक ठिकाणी नवीन पदाधिकारी नेमणुका होतायेत. संघटनात्मक बदल होत असतात. ज्यांना आमची ताकद बोचते ते अशाप्रकारचे आरोप करतात. मी माझ्यासाठी काम करतो. कुणासाठी काम करत नाही. मी माझ्या पक्षाचं आणि महाराष्ट्राचं काम करतो त्यामुळे ज्यांना टीका करायची त्यांना करत राहू द्या असं सांगत राज ठाकरेंनी भाजपाची स्क्रिप्ट वाचतायेत या विरोधकांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले.
लक्ष भरकटवण्यासाठी सीमाप्रश्न काढला सीमावादाचा प्रश्न मध्येच कसा निर्माण होतो. कुठच्या तरी गोष्टीकडून लक्ष वळवण्यासाठी होतंय का हे पाहणे गरजेचे आहे. न्यायप्रविष्ट बाब आहे. न्यायालयात जो निर्णय होईल तो होईल. पंढरपूर, जतवर अधिकार सांगतात हे कुठून येतं? मूळ बातमीकडे लक्ष घालवण्यासाठी हे कुणी करतंय का? याचा शोध पत्रकारांनी घ्यायला हवा. राज्यपालांना कुणी स्क्रिप्ट देतं का? असा प्रश्न येतो. सरकारला कुठले प्रश्न विचारू नये यासाठी अशा गोष्टी बाहेर काढल्या जातात का यासाठीही हे सुरू असते असं राज ठाकरे म्हणाले.
त्यांना प्रसिद्धी देणे बंद करानको त्या विधानांना टेलिव्हिजनवर वाव देऊ नका. नको त्या भंपक लोकांना प्रसिद्धी देता त्यामुळे असे पेव फुटले जातात. प्रसिद्धी देणे बंद करा सगळे सुधारतील. लायकी नसताना लाईक्स किती मिळाले एकमेकांना विचारत असतात. एका महिला नेत्याबद्दल एकदा नव्हे तर दोनदा मंत्री बोलतो त्याला प्रसिद्धी मिळते. या लोकांना दाखवायचं सोडून द्या वठणीवर येतील. मीडियातून सोशल मीडियात येते असं सांगत अब्दुल सत्तार यांचा राज ठाकरेंनी पुन्हा समाचार घेतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"