पुणे – मनसे नेते अमित ठाकरे यांची कार अडवल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सिन्नर येथील समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडला. या घटनेवरून राज्यभरात पडसाद उमटले. भाजपाने या प्रकारावरून अमित ठाकरेंवर टीका करत थेट ही दादागिरी राज्यात खपवून घेणार नाही असा इशारा दिला. त्यावरून पहिल्यांदाच आता या संपूर्ण प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, अमित ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. तो सगळीकडे टोल फोडत चाललाय असं नाही. एका टोल नाक्यावर हा प्रसंग घडला. अमितच्या कारला फास्टटॅग असूनही त्याला तिथे थांबवले गेले. सर्वकाही असल्याचे त्याने सांगितले. त्यावर तिथले कर्मचारी कुणाशी तरी वॉकी-टॉकीवरून बोलत होते. समोरचा माणूस उद्धटपणे बोलत होता. त्यातून आलेली ती रिएक्शन आहे. तो राज्यभरात टोल फोडत चाललाय असं नाही. परंतु त्यापेक्षा भाजपाने महाराष्ट्र टोलमुक्त करू असं आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असा सवाल राज यांनी केला.
त्याचसोबत प्रत्येकवेळी टोल म्हैसकर नावाच्या माणसाला मिळतात. हा कोणाचा लाडका आहे? ही टोलची प्रकरणे तरी काय आहे? समृद्धी महामार्गावर रस्ता बनवताना सदोष रस्ता बनवला. त्यामुळे आतापर्यंत ४०० लोकांचा मृत्यू झाला. याची जबाबदारी भाजपा किंवा सरकार घेणार का? रस्ता सुरू करण्यापूर्वी टोल बसवताय. लोकांच्या जगण्यामरण्याची काळजी नाही. लोक गाडी चालवतायेत मरूदे असं धोरण आहे का असंही राज ठाकरेंनी भाजपाला सुनावले.
केंद्रात मराठी मंत्री अन् महाराष्ट्रातले रस्ते खराब
राज्यात अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेत, वाहतूक कोंडी होते. अनेक तास ताटकळत राहावे लागतात. तुम्ही कसले टोल वसूल करताय? ही मनमानी सुरू आहे त्यावर भाजपा काय बोलणार का? १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होतोय. किती वर्ष चालणार? रस्ते बांधणीबाबत केंद्रातला मंत्री मराठी आहे आणि महाराष्ट्रातले रस्ते खराब आहेत यापेक्षा दुदैव नाही. ६५ टोलनाके मनसेच्या आंदोलनामुळे बंद झाले त्याचे कौतुक करणार नाही. पण जे टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन देऊन सत्तेत आले त्यांना प्रश्न विचारणार नाही असंही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं.
...तोपर्यंत सरकार असेच मिळणार
सगळे निर्लज्ज आहेत. याचे कारण आपला समाज आहे. सगळ्या गोष्टी भोगून परत परत त्यांनाच मतदान करायचे त्यामुळे सगळे असेच आहे. आम्ही ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला हे सांगितले आणि त्यांना पुन्हा त्यांनाच सरकारमध्ये घेणार. जोपर्यंत समाज असा आहे तोपर्यंत सरकार असेच वागणार आहे राष्ट्रवादीची पहिली टीम रवाना झाली, दुसरी टीम रवाना होईल हे मी आधीच सांगितले होते. आजही भेटीगाठी सुरू आहेत. शरद पवारांचे राजकारण तुम्ही किती वर्ष बघताय? हे सगळी मिलीभगत आहे असंही राज ठाकरे म्हणाले.