स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सादर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामरा विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कामराने केलेल्या या टिप्पणीनंतर त्याच्या शोच्या सेटवर धडक देत शिवसैनिकांनी सेटची मोडतोड केली. मात्र तरी देखील कुणाल कामरा नवनवीन गाणी पोस्ट करत असल्याने वादात भर पडत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील यांनी कुणाल कामराचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून कामराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच "धन्यवाद, कुणाल कामरा... आम्हा डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल" असं म्हटलं आहे. बिल्डरांची_मेट्रॅा, MMRDA, MSRDC, टक्केवारी, kunal_kamra हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. राजू पाटील यांच्या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
कुणाल कामराला दुसऱ्यांदा समन्स
एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत रचणारा स्टैंड अप कॉमेडियन कुणाल कामरा याला पोलिसांनी दुसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. कामराने चौकशीला उपस्थित राहण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी मागितला होता. परंतु पोलिसांनी त्याची मागणी फेटाळून लावली आहे.मुंबई पोलिसांनी कुणालला मंगळवारी पहिली नोटीस पाठवली होती.
कामराच्या वकिलांनी एक आठवडा वेळ देण्याची मागणी खार पोलिसांकडे केली होती. ही मागणी पोलिसांनी फेटाळून लावली असून, कामराला दूसरे समन्स जारी केले आहे. हे समन्स कामराच्या वडिलांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, कामराने बुधवारी नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्यात महागाई व 'निर्मलाताई' यांच्यावर टीकात्मक गाणं गायलं आहे. यावरून वादात आणखीन भर पडली आहे.
"फक्त दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी..."; कंगना राणौतने कुणाल कामराला सुनावलं
भाजपाची खासदार कंगना राणौतने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने कुणालच्या कॉमेडी एक्टचा निषेध केला आहे. "तुम्ही कोणीही असलात तरी, कोणाचाही अपमान करणं किंवा बदनामी करणं योग्य नाही. व्यक्तीसाठी आदरच सर्वस्व आहे. तुम्ही विनोदाच्या नावाखाली अपमान करत आहात. त्यांच्या कामाचा अपमान करत आहेत. शिंदेजी एकेकाळी रिक्षा चालवत होते. आज ते स्वतःच्या हिंमतीने पुढे आले आहेत. स्वतःची काय पात्रता आहे? हे लोक कोण आहेत? जे आयुष्यात काहीच करू शकले नाहीत" असं म्हटलं आहे.