Maharashtra Politics: राज्यातील आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) विदर्भ दौऱ्यावर असून, पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मनसेवर खोचक शब्दांत टीका केली होती. शरद पवार यांनी केलेल्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
शिवसेना ही शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातील मांजर बनली आहे. दसरा मेळाव्यातही शरद पवारांचेच विचार मांडले जातील, अशी खोचक टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली होती. याबाबत शरद पवार यांनी विचारणा करण्यात आली. यावर बोलताना, हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही ज्यांना आपले लोक विधिमंडळात आणता येत नाहीत त्यांच्याबद्दल काय बोलायचे?, या शब्दांत शरद पवारांनी मनसेवर निशाणा साधला होता. यावर आता मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा...
आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा....बोटं तोंडात घालाल. आम्ही 'धन'से कमी आहोत, पण 'मनसे' लई आहोत. आदर देतोय, आदर घ्या, असे ट्विट राजू पाटील यांनी केले आहे. तसेच याला ‘मौका सभी को मिलता है’, असा हॅशटॅगही राजू पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, राज ठाकरे सध्या पक्ष बांधणीसाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. याबाबत राज ठाकरेंचा चंद्रपूर दौरा आणि चित्ते भारतात येणे यावर एक प्रश्न शरद पवार यांना विचारला होता. त्यावर शरद पवार यांनी मी लोकांच्या प्रश्नांवर लक्ष देतो. या असल्या गोष्टीत फारसे बघत नाही, असे म्हणून एकूणच राज ठाकरेंच्या दौऱ्याची आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतात आणण्यात आलेल्या चित्त्यांच्या कार्यक्रमावर टीका केली.