मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक देशभरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोनाबाधितांची संख्या घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढत आहेत. कोरोनाच्या थैमानामुळे बेड्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे तौक्ते चक्रीवादळाचा पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांना मोठा तडाखा बसला असून, मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. (mns sandeep deshpande criticises pm narendra modi and cm uddhav thackeray)
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदींनी केवळ गुजरातचा हवाई दौरा केला. तसेच मोठे पॅकेजही जाहीर केले आहे. महाराष्ट्रालाही तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोणत्याही भागाचा पाहणी दौरा केलेला नाही. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
“राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी”; फडणवीसांची मागणी
दोघांमध्ये भविष्य दिसत नाही
पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही, मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही, असा टोला संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून लगावला आहे. यापूर्वी पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातही यावे. म्हणजे ते भारताचे पंतप्रधान आहेत, असे वाटेल. पंतप्रधान येऊन गेले तर उद्धव ठाकरेही महाराष्ट्रात फिरतील, असा चिमटा देशपांडे यांनी काढला होता.
“परिस्थितीचं तुम्हाला अजिबात गांभीर्य दिसत नाही”; हायकोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले
मुख्यमंत्री मुंबईत राहूनही घराबाहेर पडत नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचे स्वत:च्या राज्यावर प्रेमही आहे. पण आमचे मुख्यमंत्री मुंबईत राहूनही घराबाहेर पडत नाहीत, असा टोला देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निदान मुंबईत तरी पाहणी करण्यासाठी बाहेर पडावे, असे देशपांडे यांनी म्हटले होते. सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी काहीही केले तरी ते माफ असते. त्याशिवाय आणखी कोणत्या पक्षाने काही केले तर ते राजकारण ठरते, असे संदीप देशपांडे यांनी म्हणाले.