शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या सामनामध्ये शिंदे-फडणवीस सरकारची पहिल्या पानावर जाहिरात छापून आली आहे. सामनातून शिंदे फडणवीसांवर सातत्याने टीका होत असताना आता जाहिरात छापून आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या जाहिरातीवरून मनसेने ठाकरे गटाला खोचक सवाल विचारला आहे. "खोके सामनामध्ये पोहोचले का?" असा सवालच मनसेकडून करण्यात आला आहे. यासोबतच मनसेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
"एका ठिकाणी म्हणायचं की हे खोके सरकार आहे, अनधिकृत सरकार आहे आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच सरकारच्या जाहिराती घ्यायच्या. म्हणजेच शिवसेनेचा देव हा पैसाच आहे हे सिद्ध झालं आहे. आदित्य ठाकरे सांगत फिरत आहेत की हे खोके सरकार आहे. मग तुम्हाला त्यांच्या जाहिराती कशा चालतात? म्हणजे तुम्हाला पैसे पाहिजेत, पण सरकार नको? ही कुठली दुटप्पी भूमिका?" असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.
"मनसे काय आहे आणि काय नाही हे लोकं ठरवतील"
"आमच्या भगिनी सुषमाताई घसा कोरडा करत महाराष्ट्रभर फिरताहेत खोके सरकार, खोके सरकार करत. आणि येथे पाठी यांची जाहिरात घेऊन सेटलमेंट पण झाली. जाहिरात घेऊन सेटलमेंट केली की नाही? या प्रश्नाचं अंबादास दानवे यांनी उत्तर द्यावं. मनसे काय आहे आणि काय नाही हे लोकं ठरवतील" असं देखील संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना असं म्हटलं आहे.
"खोके सामनामध्ये पोहोचले का?"; शिंदे-फडणवीस सरकारच्या जाहिरातीवर मनसेचा सवाल
शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे सरकारची जाहिरात सामनात छापून आल्याने त्यावरून निशाणा साधण्यात येत आहे. संदीप देशपांडे यांनी या जाहिरातीवरून ठाकरे गटाला टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "खोके सामनामध्ये पोहोचले का?" असा सवाल देशपांडे यांनी केला आहे. सामनाच्या पहिल्या पानावर शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात छापून आली आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष… एका वर्षात 75,000 रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा महासंकल्प. पहिल्या टप्प्यातील नियुक्ती प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम, असा या जाहिरातीवर मजकूर लिहिण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"