शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) दणक्यात झाला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले. यानंतर आता मनसेनेशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार निशाणा साधला आहे. तसेच किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे यांच्यावरही बोचरी टीका केली आहे.
"एक रणरागिणी, एक दिवसाची नर्स... यांचा मेंदू डोक्यात आहे की गुडघ्यात? हे कळतं नाही" असं म्हणत मनसेने खोचक टीका केली आहे. तसेच "दुसऱ्यांना पाहिलं की अंधारी येते डोळ्यासमोर आणि त्यांच्याकडून शिवसैनिकांनी हिंदुत्व शिकायचं? कुठे अधोगतीला नेताय शिवसेना? बाळासाहेबांचे विचार कुठे होते?" असा सवाल करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. यासोबतच "मुंबईची तुंबई होताना हातावर हात धरून बसलात, लोकांना आयुष्यभर खड्ड्यात चालायला लावलं" असं टीकास्त्रही सोडलं आहे.
"कुठे अधोगतीला नेताय शिवसेना? बाळासाहेबांचे विचार कुठे होते?"
मनसेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी दसरा मेळाव्यावरून शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. "ज्यांनी आमच्या देवी-देवतांना शिव्या घातल्या, ज्यांना पाहिल्यावर डोळ्यासमोर अंधारी येते असे लोक हिंदुत्वाबद्दल शिवर्तीर्थावर काल बोलत होते. एक रणरागिणी, एक दिवसाची नर्स... यांचा मेंदू डोक्यात आहे की गुडघ्यात? हे कळतं नाही. दुसऱ्यांना पाहिलं की अंधारी येते डोळ्यासमोर आणि त्यांच्याकडून शिवसैनिकांनी हिंदुत्व शिकायचं? कुठे अधोगतीला नेताय शिवसेना? बाळासाहेबांचे विचार कुठे होते?"
"तुम्ही कोणाच्या खुपसला नाही का?"
"एकनाथ शिंदेंना शिव्या घालायच्या, 40 आमदारांना शिव्या घालायच्या... सगळ्यांनी तुमच्याच पाठीत खंजीर खुपसला तुम्ही कोणाच्या खुपसला नाही का? सगळे वाईट, तुम्ही एकटेच चांगले... का चांगले? तर तुम्ही महानगरपालिकेत भ्रष्टाचार केला, तुम्ही मुंबईतील लोकांना आयुष्यभर खड्ड्यात चालायला लावलं. मुंबईची रोज तुंबई होत असताना तुम्ही हातावर हात धरून बसलात. कोरोनात जनता होरपळली होती तेव्हा तुम्ही घरी बसला होता. कशासाठी म्हणायचं तुम्हाला चांगलं?" असा संतप्त सवालही संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"