मुंबई - सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांना माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (ShivSena Uddhav Thackeray) यांनी विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं आहे. "सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही; पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले" असे भावनिक उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. यावरून आता मनसेने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. "साहेब जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले" असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत. "अडीच वर्षे संपत्ती झाली आता पुढची अडीच वर्षे Simpathy" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच ||‘साहेब’ जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले|| असं कॅप्शन देत एक व्यंगचित्र देखील शेअर केलं आहे. यात मुलाखतीसाठीचा स्टुडिओ दिसतोय. मुलाखतीला सुरुवात करण्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंमधील संवाद दाखवण्यात आला आहे. "हे घ्या साहेबांनी पाठवलेले मुलाखतीसाठीचे प्रश्न आणि उत्तरं" असं संजय राऊत म्हणतात. त्यावर "बघा आता कशी देतो मी खणखणीत उत्तरं" असं उद्धव ठाकरे म्हणतात.
संभाषणावेळी संजय राऊतांच्या हातात घड्याळ आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे शरद पवार बोलतील तसंच वागत असल्याची टीका होत असताना त्यावर या व्यंगचित्रातून भाष्य करण्यात आलं आहे. मनसेने याआधी देखील अनेकदा शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे यांनी "त्या काळात माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत आणि तेव्हा पसरवलं जात होतं की, हे आता काही उभे राहात नाहीत. आता आपले काय होणार? तुझं काय होणार? ही चिंता त्यांना होती. ज्या काळात आपल्याला पक्षाला सावरण्याची वेळ होती" असं म्हटलं आहे.
माझी हालचाल बंद असताना यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या; मानेतील क्रॅम्पनंतर काय-काय घडलं
"मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती. त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. जेव्हा मी तुम्हाला पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, नंबर दोनचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळण्यासाठी पूर्ण विश्वास टाकला होता, त्या विश्वासाचा घात तुम्ही केलात. मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या पक्षाच्या विरोधात जोरदार हालचाली सुरू होत्या" असा आरोपही त्यांनी केला आहे.