भाईंदर - मीरारोड रेल्वे स्थानक परिसरात बसणा-या फेरीवाल्यांना हुसकावून लावले तरी ते पुन्हा तेथे बस्तान मांडतात. म्हणून त्यांना पुन्हा हुसकावून लावण्यासाठी मनसेचे मीरा-भार्इंदर शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (22 ऑक्टोबर) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास खळ्ळखट्याक करण्यात आले. याची कुणकूण लागताच रिपाइं (अ)चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर यांच्या नेतृत्वाखालील भीमसैनिकांनी फेरीवाल्यांच्या बचावासाठी तेथे धाव घेतली.
एलफिन्स्टन रेल्वे पादचारी पुलावरील दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरात ठाण मांडणा-या फेरीवाल्यांचा प्रश्न उपस्थित झाला. यानंतर सुरुवातीला शिवसेनेने भार्इंदर व मीरारोड रेल्वे स्थानक परिसरात बसणा-या फेरीवाल्यांना गांधीगिरी स्टाईलनं हटवण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी शिवसेनेच्या कारवाईची चाहुल फेरीवाल्यांना लागताच त्यांनी आपले बस्तान तात्पुरते हटविले. त्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्याचा प्रकार सुरु झाला. शिवसेने मागोमाग जाग आलेल्या मनसेने पालिकेला निवेदन देत रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांना हटविण्याचे निवेदन दिले.
परंतु, प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने मनसेने फेरीवाल्यांविरोधात आंदोलन छेडलं. दरम्यान ठिकठिकाणच्या रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांना हुसकावून लावण्याची मोहीम मनसेने सुरु केली असता मनसेचे मीरा-भार्इंदर शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मीरारोड रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर रविवारी रात्री 8 वाजता खळ्ळखट्याक केले. तत्पूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी मीरारोड रेल्वे स्थानक परिसरात बसलेल्या फेरीवाल्यांची पाहणी केली असता तेथे फेरीवाले नसल्याचे दिसून आले. मात्र संध्याकाळी फेरीवाल्यांनी तेथे बस्तान मांडल्याची माहिती मिळताच मनसेने तेथे धडक दिल्याचे सुर्वे यांनी सांगितले.
मनसेच्या खळ्ळखट्याकची कुणकुण स्थानिक भीमसैनिकांना लागताच त्यांनी देवेंद्र शेलेकर यांच्या नेतृत्वाखाली मीरारोड रेल्वे स्थानक परिसरात धाव घेतली. दरम्यान नयानगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी कर्मचाचा-यांमार्फत मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करुन त्यांना पोलीस ठाण्यात आणले. तेथे प्रत्येकाचे नाव व मोबाइल क्रमांक नोंद करुन त्यांना सोडून देण्यात आले. यात मनसेचे कार्यकर्ते भीमसैनिकांच्या हाती न लागल्याने दोन्ही पक्षांतील खळ्ळखट्याक मात्र टळल्याचे स्पष्ट झाले.