मुंबई - मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र असे असताना सुद्धा महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबई तुंबली नसल्याचा दावा करत आहे. यावरूनच मनसेकडून महापौर महाडेश्वर यांचा समाचार घेण्यात आला आहे. तर महाडेश्वर यांना मुंबईतील परिस्थिती दिसावी म्हणून जाड भिंगाचा चष्मा कुरियरने पाठवला असल्याचे मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी सांगितले आहे.
महापौर महाडेश्वर यांना मुंबईत तुंबलेलं पाणी आणि लोकांना झालेला त्रास दिसलाच नाही. मुंबईतील कित्येक भागात पाणी तुंबले असताना महाडेश्वर म्हणतात की, मुंबईमध्ये कुठेच पाणी तुंबलेले नाही. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांना दिसण्याचा प्रॉब्लेम असावा. म्हणून खास महापौरांसाठी हा जाड भिंगाचा चष्मा आणला आहे. या चष्म्यातून तरी महापौरांना दिसावं, अशी आमची अपेक्षा आहे. हा चष्मा आम्ही महापौरांना कुरिअरने पाठवत असल्याचे देशपांडे म्हणाले.
मुंबईतील परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तर मुख्यमंत्र्यांनंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आपत्कालीन विभागात जाऊन सर्व माहिती घेतली.