मुंबई - आज संपूर्ण देशात नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. याच मुहूर्तावर राज्यातील प्रमुख मंदिरे देखील सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली होत आहेत. मात्र नुसती मंदिरं उघडून नव्हे तर जनतेचे प्रश्न सुटले तरच खऱ्या अर्थी देवीचा कृपाशीर्वाद मिळाला असे मानता येईल. राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सलग नऊ दिवस महाराष्ट्रातील जागृत देवींना दिवसाला एक असे गाऱ्हाणे घालून महाराष्ट्र सरकारला जनतेचे हे प्रश्न सोडवण्याची सद्बुद्धी लाभो अशी प्रार्थना करणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Shalini Thackeray) यांनी यासाठी पुढाकार घेतला असून आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे त्या ही गाऱ्हाणी मांडणार आहेत. देवीपुढे गाऱ्हाणं घालून तरी लोकांचा आवाज हे सरकार ऐकेल अशी अपेक्षा बाळगून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार वारंवार जनतेची फसवणूक करत आहे. त्यामुळे जनतेचा आवाज या बहिऱ्या सरकारपर्यंत देवीसाठी घातलेल्या गाऱ्हाण्याच्या माध्यमातून पोहचावा अशी यामागे आशा असल्याचे शालिनी ठाकरे यांनी सांगितले.
राज्यात महिलांवरील वाढलेले अत्याचार, मराठवाड्यात आलेला ओला दुष्काळ, मुंबईसह उपनगरात रस्त्यांवर पडलेले खड्डे, कोरोनाच्या निमित्ताने आणलेले निर्बंध, मुख्यमंत्र्यासहित सर्व मंत्र्यांकडून देण्यात येणारी कोरडी आश्वासने, शिक्षणाचा झालेला खेळखंडोबा असे अनेक विषय ही गाऱ्हाणी घालून मांडले जाणार असल्याची माहिती मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी दिली आहे.