गौरीशंकर घाळे
मुंबई : मशिदींवरील भोंगे, हनुमान चालिसा आणि बाबरीवरून सध्या राजकीय वातावरण भलतेच तापले आहे. आव्हान आणि प्रतिआव्हानांसोबतच शेलक्या शब्दात एकमेकांच्या वस्त्रहरणाची चढाओढ राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये लागली आहे. यात मंगळवारी उपवस्त्र, फाटकी बनियन आणि थर्ड क्लास या शब्दांची उधळण राजकीय नेत्यांनी केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची शिवसेनेकडून उपवस्त्र अशी संभावना करण्यात आली. महाराष्ट्र दिनाला भाजप आणि त्यांच्या उपवस्त्र पक्षाने सभा घेतल्या. दिशादर्शक असे प्रेरक विचार त्या सभेतून राज्याला मिळतील, असे वाटले होते; पण भाजप आणि त्यांच्या उपवस्त्र असलेल्या पक्षाने लाथा झाडण्याशिवाय काहीच केले नसल्याची टीका केली. यावर, भाजप नेते आ. आशिष शेलार यांनी शिवसेनेला फाटकी बनियान म्हणत फटकारले. मनसेबद्दल काय बोलले यावर बोलणार नाही; परंतु यात भाजपला ओढले. मग, शिवसेना काय फाटकी बनियन आहे का, असा प्रश्न शेलारांनी केला. हिंदुत्वावरून तुम्ही फाटले, मुंबईच्या भ्रष्टाचारातून तुमची फाटली, मंदिराच्या बाबतीत बोटचेपी भूमिका घेऊन तुम्ही फाटलात. आता मशिदींवरील भोंगे उतरवताना तुम्ही फाटले, असा टोला शेलार यांनी लगावला.
शिवसेनेकडून मनसेची शेलक्या शब्दात संभावना झाल्याने मनसे नेत्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना नेते, खा. संजय राऊत रोजच्या रोज अत्यंत खालच्या स्तरावर उतरून बोलत असतात. आज ज्या पद्धतीने उपवस्त्राची भाषा केली ती थर्ड क्लास म्हणावी अशीच आहे. अशी भाषा एखादी थर्ड क्लास व्यक्तीच वापरू शकते. त्यामुळे संजय राऊत असेच नेते आहेत, असे म्हणावे लागेल. ते ज्या खालच्या पातळीवरून बोलतात तसेच इतरांनी बोलायचे का, असा प्रश्न मनसेचे माजी नगरसेवक संजय धुरी यांनी केला.