मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवात केली आहे. हे नवे सरकार ज्या पद्धतीने स्थापन झाले आहे, त्यावरून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी टीकास्त्र सोडले. यातच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईत निष्ठा यात्रा सुरु केली आहे. यातच पुन्हा एकदा मनसेने शिवसेनेला खोचक शब्दांत चिमटा काढला आहे. एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे.
मनसे नेत्यांसह पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर शिवसेनेला चांगलेच सुनावले आहे. आदित्य ठाकरे यांनी ‘निष्ठा यात्रा’ काढली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारपासून निष्ठा यात्रा सुरु केली आहे. आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून मुंबईतील शिवसेनेच्या शाखांना भेटी देणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. भायखळ्यातील बंडखोर आमदार यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी या यात्रेची सुरुवात केली. यावरुनच आता मनसेने आदित्य ठाकरेना टोला लगावला आहे.
एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये!
नियतीचा खेळ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘संपलेला पक्ष’ म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस झाले आणि चिन्ह देखील गमावण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले! म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये! #शिल्लकसेना, असे मनसेने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सक्रीय
शिवसेनेवरील पकड मजबूत ठेवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सक्रिय झाले आहेत. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी आपापल्या भागात जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा वारसा सांगायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ही स्थिती दूर करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, भाजपची सी टीम म्हणत यापूर्वी आदित्य ठाकरेंनी मनसेवर टीका केली होती. मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण आता मला बरे वाटतंय की भाजपची सी टीम म्हणून त्यांना थोडे काम मिळाले आहे. बी टीम एमआयएम आहे आणि सी टीम मनसे आहे. जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचे, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. तसेच संपलेल्या पक्षांवर मी उत्तरे देत नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते.