अहमदनगर : ‘ब्लू प्रिंट’ हातात घेऊन महाराष्ट्र घडवायला निघालेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राज्य पक्ष म्हणून असलेली मान्यताच धोक्यात आली आहे. त्यांचा पक्ष आता केवळ नोंदणीकृत पक्ष म्हणून उरणार आहे. ‘मनसे’ सध्या राज्य पक्षांच्या यादीत आहे. कारण गतवेळी त्यांचे १३ आमदार निवडून आले होते. राज्य पक्षाचा दर्जा मिळाल्याने त्यांचे ‘रेल्वे इंजिन’ हे चिन्हही अधिकृत झाले होते. मात्र लोकसभा व या विधानसभा निवडणुकांत मनसेची कामगिरी निराशाजनक राहिल्याने त्यांचा हा दर्जा अडचणीत आला आहे. राज्य पक्षाचा दर्जा टिकविण्यासाठी पक्षाला राज्यात सहा टक्के मते हवीत, तसेच किमान दोन आमदार निवडून यायला हवेत किंवा लोकसभा निवडणुकीत पक्षाला राज्यात सहा टक्के मते मिळून एक खासदार निवडून यायला हवा. या दोन्ही अटी मनसे पूर्ण करीत नाही. कारण त्यांचा एकही खासदार निवडून आलेला नाही. तसेच विधानसभेतही त्यांना अवघी एक जागा व ३.१ टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग त्यांचा राज्य पक्षाचा दर्जा काढून घेईल. असे झाल्यास मनसे इतर छोट्या पक्षांप्रमाणे केवळ नोंदणीकृत पक्ष म्हणून उरेल. या निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रादेशिक अस्मितेच्या राजकारणाचा मुद्दा जोरकसपणे मांडला. पण प्रादेशिक पक्ष म्हणून असलेली राज्यातील मान्यता टिकविणे देखील मनसेसाठी मुश्कील झाले आहे. (प्रतिनिधी)
‘मनसे’ची मान्यता धोक्यात
By admin | Published: October 21, 2014 4:21 AM