गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेले महायुतीतील जागा वाटपाचे वाद आज सुटले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी ठाणे, कल्याण नंतर थोड्या वेळाने नाशिकचे उमेदवार जाहीर करून या जागा शिवसेनाच लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर उमेदवारी जाहीर होताच मनसेची रसद घेण्यासाठी श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के हे राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत.
राज ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर त्यांचा फोटो खूप बोलका आहे. राज ठाकरेंनी दोघांच्याही खांद्यावर हात टाकून मनसेच्या कार्यकर्त्यांना मी यांच्या पाठीशी असल्याचा, पाठिंबा दिल्याचा संदेश दिला आहे. ठाणे आणि कल्याण भागात मनसेची मोठी ताकद आहे. या भागात मनसेचे नगरसेवक, आमदारही आहेत. यामुळे याचा फायदा शिंदे आणि म्हस्के यांना होण्याची शक्यता आहे.
आज ठाणे मधून नरेश म्हस्के व कल्याण मधून माझी उमेदवारी जाहीर झाली. राज ठाकरे यांचा आशिर्वाद घेण्यासाठी इथे आलो आहोत. राज ठाकरे यांनी आम्हाला भरभरुन आशिर्वाद दिला आहे. कल्याण, ठाण्यामध्ये येणाऱ्या काळात राज ठाकरे यांच्या सभा होणार आहेत, असे श्रीकांत शिंदे यांनी भेटीनंतर स्पष्ट केले.
ठाणे असेल किंवा कल्याण असेल या दोन्ही जागांची घोषणा झाली आहे. महायुतीच्या या दोन्ही जागा प्रचंड बहुमताने निवडून येतील. नरेश म्हस्के एक सामान्य कार्यकर्ते आहेत. महापालिकेमधून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. हा पूर्ण जिल्हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना मानणारा जिल्हा आहे, असे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदे म्हणाले होते.