"सावरकर यांच्या संदर्भात अपमानजनक वक्तव्य केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही," मनसेचा राहुल गांधींना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 02:06 PM2024-03-13T14:06:08+5:302024-03-13T14:06:56+5:30
संदीप देशपांडे म्हणाले, "छत्रपती शिवाजी पार्क मैदानाने अनेक वाघांच्या डरकाळ्या ऐकल्या आहेत. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, आचार्य आत्रे असतील, राज ठाकरे असतील."
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. ही यात्रा 17 मार्चला शिवाजी पार्कवर पोहोचणार आहे. येथे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची एकत्र सभा होणार आहे. यावरून, सावरकर यांच्या संदर्भात अपमानजनक वक्तव्य केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींना यांना दिला आहे.
संदीप देशपांडे म्हणाले, "छत्रपती शिवाजी पार्क मैदानाने अनेक वाघांच्या डरकाळ्या ऐकल्या आहेत. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, आचार्य आत्रे असतील, राज ठाकरे असतील. त्याच शिवतीर्थावर दुर्दैनाने 17 तारखेला काँग्रेसच्या कोल्ह्यांची कुही कुही ऐकण्याचं दुर्भाग्य महाराष्ट्राला लाभणार आहे. त्याच बरोबर बाघाचं कातडं पांघरलेले लांडगेही त्यांच्यासोबत असतील असं वाटतंय. माहीत नाही. पण लोकशाहीत प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. हे आम्ही मान्य करतो."
...तर राहुल गांधी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही -
"राहुल गांधींना एक नक्की सांगतो, छत्रपती शिवाजी पार्क मैदान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आहे. सावरकरांचं घर या छत्रपती शिवाजी पार्क मैदानाजवळ आहे. तुम्ही महाराष्ट्रात येत आहात, तुमचं म्हणणं मांडा आमची ना नाही. मात्र येथे येऊन पुर्वीप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात अपमानजनक वक्तव्य केलं, तर ही महाराष्ट्रातील चौदा कौटी जनता, राहुल गांधी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही," असे देशपांडे म्हणाले.