मुंबई - वादग्रस्त राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी यांची जगात प्रसिद्धी झाली आहे. महाराष्ट्राचा विसर राज्यपालांना पडला आहे. महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं राज्य, त्यातील लोक यांना विसरता कसे? मुंबईचे लोक सगळ्यांना सामावून घेतात. हा जर गुन्हा असेल तर असा गुन्हा अनेकदा करू. राज्यपालांसारखं एकही काम तुम्ही केले नाही असा टोला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.
त्याचसोबत शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेचं कौतुक केले आहे. पेडणेकर म्हणाल्या की, मनसे हा कसाही पक्ष वेगळा असला तरी मराठी न्यायहक्कासाठी, हिंदुसाठी यांनी दिलेल्या स्क्रिप्टला बाजूला ठेवून बोलणारच. कारण त्यांच्या धमन्यांमध्येही महाराष्ट्र आणि मुंबईचं रक्त वाहतंय असं त्यांनी सांगितले तर मुंबई, महाराष्ट्रासाठी मिळवणाऱ्यांचा हा अपमान आहे. दीपक केसरकर एका गटाचे प्रवक्ते आहेत. भाजपाकडून लिहिलेली स्क्रिप्ट ते बोलतात. त्यातील एखादं पान गेले तर अशी अवस्था होते. आमच्या महाराष्ट्राचा, मुंबईचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
राणे कुटुंबीयांवर हल्लाबोलनितेश जेव्हा गोधडीत होता तेव्हा त्याचे वडील बेस्टचे चेअरमन होते. तेव्हापासूनचा सगळा इतिहास नितेशने तपासून पाहावा. कसेकसे कोणाकोणाला मोठे केले मग वर तोंड करून बोलावं. ज्या ज्या पक्षात जातात तिथे सुपारी वाजवतात. सुपारी वाजवणारं कुटुंब त्यांच्याकडून काय आदर्श घेणार? तो इतिहास घेऊन यावा मग माझ्याशी बोलावं असं आव्हान किशोरी पेडणेकरांनी दिले.
राज ठाकरे काय बोलले?मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पत्र ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत इशाराही दिला आहे. ‘आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात,’ असं त्यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.
‘मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो,’ असं म्हणत त्यांनी इशारा दिला आहे.