अकोला - राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी आणि मनसे यांच्यातील वादात जय मालोकर नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला होता. जयचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असं सांगितले जात होते मात्र या प्रकरणी जयच्या कुटुंबाने संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती. आता या प्रकरणात पोस्टमोर्टम रिपोर्टमुळे मोठा ट्विस्ट आला आहे.
जय मालोकरचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नव्हे तर जबर मारहाणीमुळे झाल्याचं पोस्टमोर्टम रिपोर्टमधून उघड झालं आहे. ३० जुलैला अकोला शासकीय विश्रामगृहात मनसे कार्यकर्त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्याविरोधात आंदोलन केले. यावेळी मिटकरींची कार फोडण्यात आली. या आंदोलनाच्या काही तासानंतर जय मालोकर या मनसे पदाधिकाऱ्याच्या मृत्यूची बातमी समोर आली.
पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये काय?
जय मालोकर याला जबर मारहाण झाल्याने त्याच्या पाठीवर, छातीवर, डोक्यावर, मानेवर मार लागला होता. छातीच्या ४-५ बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर होत्या. जयच्या डोक्याला आतमधून गंभीर दुखापत झाली होती. पोस्टमोर्टम रिपोर्टवेळी जयच्या मेंदूवर सूज असल्याने मेंदूचे वजन वाढले. मानेवर जबर मारहाणीमुळे मज्जातंतूंना दुखापत. या सर्व गोष्टीमुळे शेवटी न्यूरोजनिक शॉकमुळे जयचा मृत्यू झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, जयचा पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यानंतर त्यात स्पष्टपणे त्याला गंभीर दुखापत झाल्याचं दिसून येते. त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाला नाही. या प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय व्हावी आणि आमच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची विनंती आहे. आमचा संशय सध्यातरी कुणावर नाही. या गोष्टीची पडताळणी होईल तेव्हा नेमकं यात आरोपी कोण हे कळेल अशी मागणी जयच्या भावाने केली आहे.
राज ठाकरेंनी घेतली होती कुटुंबाची भेट
जयच्या मृत्यूनंतर तातडीने मनसे नेते अमित ठाकरे हे मालोकर कुटुंबाच्या भेटीला अकोला इथं पोहचले होते. त्यानंतर विदर्भ दौऱ्यावेळी राज ठाकरे स्वत: मालोकर कुटुंबाची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला होता. मनसेकडून या प्रकरणी अमोल मिटकरींवर सातत्याने आरोप होत होते. आता हे प्रकरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.