मुंबई - लोकसभा निवडणुकीत मनसेने तटस्थ राहत उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची काय भूमिका असणार आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहेत. मात्र मनसेने विधानसभा निवडणुका लढवली किंवा लढवली नाही, तरीही आम्ही राज ठाकरे यांच्या सोबत राहणार असल्याचा खुलासा औरंगाबदचे मनसे जिल्हाप्रमुख गौतम अमराव यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता पुढील महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र मनसेने आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये राज ठाकरेंच्या निर्णयाची उत्सुकता लागली आहे. मात्र राज ठाकरे यांनी कोणताही निर्णय घेतला तरीही आम्ही पक्षाचे काम करत राहणार आहोत, असे अमराव म्हणाले.
त्याच बरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील पक्ष वाढवण्याचे काम सुरु असून, शहरातील मनसेचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा खोटी असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला. त्याच बरोबर विधानसभा निवडणुकीत बाबत राज ठाकरे जो आदेश देतील, त्याप्रमाणे पक्षासाठी काम करणार आहोत. त्यामुळे वरिष्ठांचा काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार असल्याचे सुद्धा गौतम अमराव म्हणाले.